अवघ्या काही तासात मनमाड येथून दोघांना उचलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 11:26 AM2018-08-03T11:26:48+5:302018-08-03T11:29:57+5:30
धुळे शहर पोलीस : दरोडेखोरांपैकी एक फरार, पहाटेचा थरार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : मालेगाव रोडवरील न्यू प्रतिक डेअरीमध्ये गुरुवारी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास गोळीबार करत लुट केल्याची घटना घडली़ त्यानंतर संशयित तिघे दुचाकीने पळून गेल्यानंतर शहर पोलिसांच्या पथकाने अवघ्या काही तासात दोघांना पकडले़ त्यातील एक मात्र पोलिसांना तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला़ ही घटना शुक्रवारी पहाटे ४ वाजून ५ मिनीटांनी मनमाड येथे घडली़
मालेगाव रोडवरील न्यू प्रतिक डेअरीत बंदुकीचा धाक दाखवत गल्यातील १० ते १५ हजार रुपये लूटून नेण्यात आले़ त्यांच्या मागावर आलेल्यांना पाहून एकाने पिस्तूलमधून गोळी झाडली़ ती गोळी काऊंटरला लागून काच फुटल्याने नुकसान झाले़ माहिती मिळताच घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले़ पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडेखोरांचा शोध सुरु झाला़ पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल राजपूत, कबीर शेख, दिनेश परदेशी, बापू वाघ, पंकज खैरमोडे, मुक्तार मन्सुरी आणि गणेश यांचे पथक नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे दरोडेखोरांचा तपास करत दाखल झाले़
मनमाड येथील भगतसिंग मैदानात शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास गोळीबार झाला़ धुळे येथून दूध डेअरीत दरोडा टाकून फरार झालेल्या दरोडेखोरांमध्ये चोरीचा माल वाटणीवरुन वाद झाला़ दोघांनी त्यांचा जोडीदार गुरु भालेराव याच्यावर गोळी झाडली़ त्याचवेळेस या दरोडेखोरांच्या मागावर असलेले धुळे पोलिसांचे पथक तेथे दाखल झाले़ त्यांनी तात्काळ त्या तिघांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील गुरु भालेराव आणि सागर मरसाळे यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले़ मात्र, पोलीस पथकाला तुरी देवून एक जण फरार झाला़ ही कारवाई शुक्रवारी पहाटे ४ वाजून ५ मिनीटांनी झाली़ जखमी गुरु भालेराव याच्यावर धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत़