धुळे शहरासह तालुक्यात दगड भिरकाविल्याने बस नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 06:25 PM2018-08-12T18:25:47+5:302018-08-12T18:27:51+5:30
तीन वेगवेगळ्या घटना : महामंडळाचे आर्थिक नुकसान, गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरात दोन ठिकाणी आणि तालुक्यातील गरताड शिवारात बसवर दगडफेकीच्या तीन घटना घडल्या़ यात महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले आहे़ या घटनेत एका बसचा चालक जखमी झाला असून याप्रकरणी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली़
गरताड शिवारातील घटना
धुळे ते सोलापूर मार्गावर गरताड बारीत धुळे तालुक्यातील बंद सुतगिरणीजवळ बसवर दुचाकीने आलेल्या एकाने दगड भिरकाविला़ यात चाळीसगावहून धुळ्याकडे येणाºया एमएच २० बीएल ४०४२ या क्रमांकाच्या बसचा पुढील काच फुटला़ ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान घडली़ यात बसचा चालक भूषण फकीरा बोईनीस (३२) यांच्या छातीला दगडाचा मार लागल्याने दुखापत झाली आहे़ याप्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशनला भूषण बोईनीस यांनी फिर्याद दाखल केली आहे़ त्यानुसार गुन्हा दाखल झाला़
धुळ्यात घडल्या दोन घटना
शहरातील कालिका माता मंदिराजवळ शुक्रवारी १० सुमारास एकाने दगड भिरकाविला़ यात शिरपूर आगाराच्या एमएच २० पीएल २४९२ या क्रमांकाच्या बसचा मागील काच फुटल्याने नुकसान झाले़ याप्रकरणी बस चालक रामसिंग गुमानसिंग राऊळ (४२, रा़ करवंद ता़शिरपूर) यांनी धुळे शहर पोलीस स्टेशनला शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ तसेच शहरातील डॉ़ सुभाष भामरे यांच्या दवाखान्याजवळ रस्त्याचे काम सुरु आहे़ याठिकाणी एमएच ४० एक्यू ६१७५ या क्रमांकाची बस वळण घेत असताना तीन अनोळखी व्यक्तींकडून बसवर दगड भिरकाविण्यात आला़ यात बसचा मागील काच फुटला़ ही घटना रविवारी पहाटे सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी बसचालक गुलाब संतोष चेके (४९, रा़ सुरा जि़ बुलढाणा) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला़