धुळ्यातील कबीरगंजची घरफोडी आठवड्यातच उघड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 10:08 PM2018-08-16T22:08:18+5:302018-08-16T22:10:16+5:30
१ लाख ८७ हजारचा ऐवज : तिघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहरातील कबीरगंज भागात घरफोडी करुन १ लाख ८७ हजाराचा ऐवज लंपास करणाºया तिघा चोरट्यांना मुद्देमालासह अवघ्या आठवड्याभरात चाळीसगाव रोड पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले़ चोरट्यांकडून सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
महफुजूल हसन शब्बीर अहमद हे ७ आॅगस्ट रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या आई-वडील यांना घेऊन मुंबईला गेले होते़ त्यांचे आई-वडील हजयात्रेसाठी गेल्यानंतर ९ रोजी ते घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ चोरट्याने घराचे लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटातील ४० हजाराची रोकड सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख ८७ हजाराचा ऐवज चोरट्याने लंपास केला़ याबाबतची फिर्याद अहमद यांनी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला दिली होती़
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश इंदवे, कर्मचारी शंकर महाजन, जोएब पठाण, प्रेमराज पाटील, मुक्तार शहा, मुक्तार मन्सुरी, संदीप कढरे यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली़ मिळालेल्या माहितीच्या आधारावर संशयित फिरोज शेख अब्दुल कलाम, मोहम्मद शाहीद मोहम्मद हानीद, शरीफ सईद सादीक (सर्व रा़ कबीरगंज, धुळे) यांना पथकाने ताब्यात घेतले आहे़ त्यांना पोलीसी खाक्या दाखविताच त्यांनी घरफोडी केल्याचे कबूल केले़ चोरट्यांकडून १० हजार रुपयांची रोकड, १ हजार रुपये किंमतीचा मोबाईल, २० हजार रुपये किंमतीच्या घड्याळी आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख २९ हजार ७२८ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़