कापडणे गावात ८ आॅगस्टपर्यंत कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:52 PM2020-07-29T12:52:22+5:302020-07-29T12:57:06+5:30
सरपंच बाधित : मालपूर येथे खासगी डॉक्टरसह तीन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
कापडणे/मालपूर : कापडणे गावात ६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात सरपंचांचा अहवालही पॉझिटिव्ह आल्याने गाव प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले असून ८ आॅगस्टपर्यंत कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे खासगी डॉक्टरसह तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे.
मालपूरला चिंता वाढली
मालपूर येथे खासगी डॉक्टरांसह, पत्नी व ४०वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या डॉक्टरांकडे औषधोपचार करुन गेलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. मात्र, आलेल्या रुग्णांची त्यांच्याकडे कुठलीही नोंद नसल्यामुळे ट्रेसिंग करण्याच्या कामात मोठी अडचण निर्माण झाल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.हितेंद्र पाटील यांनी सांगितले. तसेच या डॉक्टरांकडे ज्यांनी उपचार घेतले त्यांनी स्वत: पुढे येऊन तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने निर्जंतुकीकरण फवारणी करुन बाधित रुग्णांचा परिसर सिल केला आहे. बाधित रुग्णांना दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोंडाईचा मंडळ अधिकारी एम.एम. शास्त्री यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या बैठकीत संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले. तर सरपंच मच्छिंद्र शिंदे यांनी गाव तीन दिवस संपुर्ण बंद राहिल, असे सांगितले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.हितेंद्र पाटील, डॉ.शशीकांत आगळे, उपसरपंच जगदीश खंडेराय, माजी सरपंच हेमराज पाटील, ग्रामविकास अधिकारी एल.सी. पाटील, पोलीस पाटील बापू बागुल, सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक दीपक कुमार, ग्रामपंचायत सदस्य अजय साळवे, कैलास माळी आदी उपस्थित होते. शिंदखेडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मानसिंग वळवी यांनी कन्टेंमेन्ट झोनची पाहणी केली. गावात ९ टिमच्या साहाय्याने सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. तर दुपारी संपर्कात आलेल्या ७ जणांना दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब तपासणीसाठी नेऊन होम क्वॉरंटाईन करण्यात आले.
कापडणेला दोन दिवसात ६ रुग्ण
कापडणे येथे २४ व २७ जुलै या दोनच दिवसात ६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तहसीलदार किशोर कदम यांनी संपूर्ण कापडणे गाव आहे कंटेनमेंट क्षेत्र घोषित केले असून २५ जुलै ते ८ आॅगस्टपर्यंत संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र राहणार आहे. कापडणे गावातील कंटेनमेंट क्षेत्रात पूर्णपणे संचारबंदी लागू राहणार आहे. कंटेनमेंट क्षेत्र वगळून बफर झोन क्षेत्रात किराणा दुकाने, भाजीपाला, फळे विक्रीची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ यावेळेत सुरू राहतील. दरम्यान, सरपंच कोरोना बाधित झाल्याने ग्रामपंचायतीचा कारभार पाच दिवस ठप्प झाला आहे. ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकाऱ्यांसह ४ बाधित रुग्णांच्या कुटुंबातील सदस्य अशा २२ जणांचे धुळे जिल्हा रुग्णालयात २८ जुलै रोजी स्वॅब घेण्यात आले आहेत. एकाच घरात तीन कोरोना बाधित आढळून आहेत. सरपंचासह त्यांच्या घरातील अन्य दोन जण बाधित आढळून आले आहेत. सरपंचांच्या संपर्कात आलेल्या ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकाऱ्यांचा २८ स्वॅब घेण्यात आला आहे. धुळे गटविकास अधिकाºयांच्या आदेशान्वये २८ जुलै ते १ आॅगस्टपर्यंत पाच दिवस ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्यात आलेले आहे. ग्रामपंचायत प्रशासनामार्फत २८ रोजी गावात हायड्रोक्लोराइडची फवारणी करण्यात आली आहे. यापूर्वी देखील सात वेळेस गावात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आलेली आहे.