‘कौन है यह चुडामण आनंदा पाटील?’; पंडित नेहरुंचा अचंबित होऊन सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 07:26 AM2024-04-07T07:26:28+5:302024-04-07T07:27:02+5:30
स्वत:पेक्षा जास्त मत मिळाल्याने पंडित नेहरूही अचंबित
राजेंद्र शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघाची यापूर्वी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळख होती. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीची बरीच वर्षे या मतदारसंघाने काँग्रेस पक्षालाचा साथ दिली होती. १९६२ रोजी झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे चुडामण आनंदा पाटील भरघोस मतांनी निवडून आले होते.
सभागृह देखील झाले होते अवाक
nचुडामण यांना १,४८,४५२ मते मिळाली होती. तर फुलपूर (यूपी) मतदार संघातून लढलेले पंतप्रधान पंडित नेहरू यांना १,१८,९३१ मते मिळाली होती.
nते पाहून स्वतः नेहरू अवाक् झाले होते. त्यांनी निवडणुकीनंतर लोकसभेचे अधिवेशन झाले तेव्हा सभागृहातच “कौन है यह चुडामण आनंदा पाटील”, असे विचारले होते. तेव्हा चुडामण आनंदा पाटील यांनी आपली ओळख दिली होती.
नेहरूंनी घेतली वैयक्तिक भेट!
पंडित नेहरू यांनी त्यानंतर चुडामण पाटील यांना वैयक्तिक भेटीस बोलाविले होते. भेटीत नेहरूंनी चुडामण पाटील यांच्याकडून धुळे लोकसभा मतदारसंघातील प्रश्न आणि त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबाबत जाणून घेतले होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील हे चुडामण पाटील यांचे चिरंजीव, तर आमदार कुणाल पाटील हे नातू आहेत.
विजयाची हॅट्ट्रिक
धुळे लोकसभा मतदारसंघातून चुडामण आनंदा पाटील यांनी १९६२, १९६७ आणि १९७१ च्या निवडणुकीत विजय मिळवित, हॅटट्रिक केली होती.