नकाणे तलावात दरवळतोय केवड्याचा गंध

By Admin | Published: January 4, 2017 08:31 AM2017-01-04T08:31:16+5:302017-01-04T08:33:35+5:30

धुळ्यात नैसर्गिक पर्यटन स्थळांमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

Kavada odor is found in the lake | नकाणे तलावात दरवळतोय केवड्याचा गंध

नकाणे तलावात दरवळतोय केवड्याचा गंध

googlenewsNext

रामनिकुंभ, ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. २३ - शहरातील नकाणे तलावाजवळील कधीकाळी समृद्ध असलेल्या केवड्याच्या वनाचा सुगंध आजही दरवळतो आहे. हा सुगंध इथल्या केवड्याच्या समृद्धवनाची कहाणी सांगतो. धुळे शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर नकाणे तलाव आहे़ या तलावातून जवळपास निम्मे शहराला पाणीपुरवठा केला जातो़ काही वर्षापूर्वी नकाणे तलाव तुडुंब भरलेला असायचा, पश्चिमेला खालच्या बाजूला बांध होता, त्याचे पाणी परिसरात झिरपायचे़ वर्षभर मिळणाऱ्या या पाण्यामुळे केवड्याचे घनदाट वन तयार झाले. 

बांधापासून जवळच केवड्यासह चंदन, जांभळाच्या झाडांचाही समावेश इथे आहे. त्यात केवड्याचे वन अधिक विस्तीर्ण पसरले. संपूर्ण परिसरात दिवसभर केवड्याचा सुुगंध दरवळत असतो. त्यामुळे नकाणे तलाव परिसर म्हणजे जणू ‘निसर्ग पर्यटन स्थळ’ बनले आहे. कुठेतरी फिरायला जायचे म्हणून धुळेकर नकाणे तलाव परिसरात येत असतात. 
 
केवडा हे भारतीय वंशांचे झाड असून जमिनीची धूप थांबवण्यासाठी ते अतिशय उपयुक्त आहे़ ते इतके घनदाट असते की त्याच्या आत पक्षी अतिशय आनंदाने राहू शकतात़ त्याच बरोबर केवड्याच्या गंध हा बराच काळ टिकून राहतो व दूरवरही पसरतो़ केवड्याच्या पानांना असलेल्या काट्यांमुळे इतर प्राण्यांना किंवा माणसांना आत जाणे सहसा सोपे नसते़ त्यामुळे ते काही प्राण्यांसाठी उत्तम निवासस्थान ठरते. तलावातील केवड्याचे वन आता काही प्रमाणात कमी झाले असले तरी आजही तेथे केवड्याचा सुगंध दरवळत असतो. 
 
केवड्याने दिला रोजगार
नकाणे तलावातील केवड्याचे वन हे अनेकांसाठी रोजगाराचे साधन बनले आहे. महिंदळे शिवारातील काही लोक पहाटे लवकर नकाणे तलाव परिसरात जाऊन केवड्याचा कंद तोडून ते शहरात विक्री करतात. आता हे प्रमाण कमी झाले आहे. 
 
वृक्षतोडीचा चंदन, जांभळाला फटका 
४नकाणे तलाव परिसरात १५ ते २० वर्षांपूर्वी केवड्यासह चंदन व जांभळाचेही घनदाट वन होते़ इथल्या जांभळांना गोड चव आहे. ज्येष्ठ महिन्यात महिला जांभळे वेचून त्याची शहरात विक्री करतात. तसेच परिसरात चंदनाच्या झाडांचीही प्रचंड संख्या होती़ चंदनाची ही झाडे आता काही प्रमाणात नष्ट झाली आहेत.
 
 

 

Web Title: Kavada odor is found in the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.