खुडाण्यातील सरपंच कल्पनाबाई गवळे यांना लोकमतचा सरपंच आॅफ दि ईअर पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 03:55 PM2019-02-22T15:55:47+5:302019-02-22T15:59:14+5:30
जलव्यवस्थापनावर उत्कृष्ठ कार्य
साक्री तालुक्यातील खुडाणे गावाने लोकसहभागातून घटबारी पाझर तलावाची निर्मिती करून सर्वांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. रोहिणी नदीवर दोन केटीवेअर बंधारे. शुद्ध पाणीपुरवठा व माती बांधांचे लोकसहभागातून निर्माण या बाबीही उल्लेखनीय आहेत. नवीन रोहित्र बसविण्यासह मुख्य चौकात हायमास्ट दिवे, जि.प. शाळेत सौर ऊर्जेवर डिजिटल वर्ग चालविला जातो. ग्रा.पं.त आपले सरकार ई सेवा केंद्रामार्फत पाचवी ते १०वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी गणित, इंग्रजी विषयांसाठी इ लर्निंग क्लासेस सुरू केले आहेत. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी विद्यार्थ्यांसाठी सर्व आवश्यक पुस्तके उपलब्ध केली आहेत. गावातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन प्रोत्साहित केले जाते. नव्या पिढीला थोर समाजपुरुषांची ओळख व्हावी, यासाठी प्रत्येक थोर पुरुषांची जयंती, पुण्यतिथी कार्यक्रमांचे ग्रा.पं. मार्फत आयोजन केले जाते. त्यात ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी असे सारे सहभागी होतात. गावात महाराष्टÑ स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत कामधेनू योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. गावाला म.गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार २०१६, म.फुले आदर्श समाज सेवक निसर्ग मित्र पुरस्कार २०१७, उत्कृष्ट सरपंच पुरस्कार २०१८, स्वामी विवेकानंद प्रेरणा पुरस्कार २०१९ असे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. गावामध्ये पायाभूत सोयी, ग्रामरक्षण, कृषी तंत्रज्ञान, शैक्षणिक सुविधा, जल व वीज व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले काम उभे राहिले आहे. कार्यक्रमात सरंपच कल्पना गवळे यांचा मुलगा पराग गवळे यांनी हा पुरस्कार स्विकारला़