खान्देशचे ग्रामदैवत कानुमातेची आज होणार स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:58 AM2019-08-04T11:58:05+5:302019-08-04T11:58:26+5:30
संडे अँकर । उत्सवाची घरोघरी जय्यत तयारी, सर्वत्र उत्साहाचे वातावरण, दुसºया दिवशी होणार विसर्जन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे/ हातनुर : खान्देशातील ग्रामदैवत कानुबाईचा सण उत्साह आणि आनंदात साजरा केला जातो. रविवारी कानुबाईचे आगमन होणार आहे. तर सोमवारी (५ आॅगस्ट) कानुमातेचे वाजत-गाजत विसर्जन करण्यात येणार आहे.
दरवर्षी श्रावण महिन्याच्या दुसºया रविवारी कानुमातेचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जात असतो. मात्र यावर्षी दुसºया रविवारी एकादशी आहे. एकादशीच्या दिवशी रोटांचा नवैद्य चढविणे योग्य ठरणार नसल्याचे जाणकारांचे मत आहे. तर तिसºया रविवारनंतर पौर्णिका आहे. त्यामुळे तेव्हाही शक्य होणार नसल्याचे अनेकजण श्रावण महिन्यातील पहिल्याच रविवारी हा सण साजरा करणार आहेत. असे असले तरी काहीजण मात्र श्रावण महिन्यातील दुसºया रविवारीही हा सण साजरा करण्याच्या मानसिकतेत आहेत.
चौरंगावर कानुमातेची स्थापना केली जाते. त्यासाठी केळीचे खांब, विड्याचे पान, सुपारी, नारळ, ओटी आदी साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत महिलांची गर्दी झालेली होती. देवीसमोर पाच फळांचे नवैद्य ठेवण्यात येत असते. त्यामुळे विविध फळांनाही मागणी होती.
भडणे गावात झाली बैठक
दरम्यान शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे कानुमाता उत्सव साजरा करण्यासाठी सरपंच गिरीश पाटील, उपसरपंच अशोक माळी, विश्वनाथ पाटील, वामन देसले, युवराज माळी यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक झाली. यात गावात एकमताने हा उत्सव साजरा करण्याचे ठरले. या उत्सवामुळे गावात एकोपा निर्माण होत असतो. यालाच कानबाई मातेचा रोट म्हणतात. ज्या घरात कानुबाईची स्थापना केली जाते अशा सर्व कुटुंबात रोट तयार केले जात असतात. या उत्सवासाठी गावातील बाहेरगावी गेलेली मंडळी या उत्सवानिमित्त गावात येत असतात. अत्यंत पवित्र वातावरणात सुहासिनी कानबाई मातेची स्थापना करतात. फुलामाळांनी सजवून देवीचा गाभारा आणि मंडप तयार केला जातो.त्यावरची अशी आकर्षक रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेते. कलशावर नारळ ठेवून त्यावर नथ, डोळे लावून त्याला कानबाई मातेचं रुप दिल जाते. त्याला अलंकारानं सजविले जाते. कानुमातेची उत्साहात पूजा केली जाते.
सोमवारी होणार विसर्जन
दरम्यान सोमवारी कानुमातेचे वाजत-गाजत विसर्जन करण्यात येणार आहे. यावर्षी आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाल्याने उत्साह द्विगुणीत वाढलेला आहे.
रात्री अहिराणी गीतांसह जागर..
खान्देशचे ग्रामदैवत कानुमातेची उत्साहात स्थापना झाल्यानंतर कुटुंबातील सदस्य, परिसरातील महिला रात्रभर अहिराणी भाषेतील गाणी म्हणत असतात. या उत्सवासाठी ‘रोट’चा प्रसाद तयार केला असतो. हा प्रसाद कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन ग्रहण करतात. अत्यंत पवित्र समजला जाणारा हा सण ग्रामीण भागात मोठ्या उत्सहात साजरा केला जातो.