लहान मुलांचे भांडण महिलेवर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:57 PM2019-01-07T12:57:47+5:302019-01-07T12:59:51+5:30
आझादनगर : दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : लहान मुलांच्या भांडणानंतर शिवीगाळ झाल्या प्रकरणी महिलेवर चाकूने हल्ला झाल्याची घटन शहरातील गल्ली नंबर ७ मध्ये शनिवारी घडली़ याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात रविवारी पती-पत्नीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला़
शहरातील गल्ली नंबर ७ मधील जय बालाजी वॉटरसमोर शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गल्लीत लहान मुलांच्या खेळण्यावरुन भांडण झाले होते़ त्यानंतर एका मुलीला धक्काबुक्कीचाही प्रकार घडला होता़ यावेळी वाद निर्माण झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़ यानंतर दर्शन नामक मुलाचे नाव घेऊन शिवीगाळ झाल्याचा प्रकार घडल्याने तणावात अधिकच भर पडली होती़ हा वाद शमविल्यानंतर त्याचे पडसाद पुन्हा रविवारी सकाळी उमटले़ यातून महिलेवर चाकूने हल्ला झाला़ यात महिलेच्या डाव्या हाताच्या मनगटावर जबर दुखापत झाली आहे़ जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत़
वादाचे पडसाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत जावून पोहचले आहेत़ या प्रकरणी जखमी महिला लताबाई चंद्रकांत थोरात (६०, रा़ गल्ली नंबर ७, जय बालाजी वॉटर समोर, धुळे) या महिलेने आझादनगर पोलीस ठाण्यात रविवारी दुपारी पावणे चार वाजता फिर्याद नोंदविली आहे़ त्यानुसार, आनंद सरोदे आणि त्यांची पत्नी (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्या विरोधात भादंवि कलम ३२४, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ एम़ सी़ पाटील तपास करीत आहेत़