कोळी समाज ५५१ वधूवरांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 09:38 PM2018-12-11T21:38:53+5:302018-12-11T21:39:15+5:30
डिसेंबरमध्ये परिचय मेळावा : समाजात चालीरीती बाजूला ठेवून विवाह
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : कोळी समाजाचा वधूवर परिचय मेळावा समितीच्या प्रयत्नाने हुंडा न घेता, समाजातील जुन्या चालीरीतींना फाटा देत, मानपान टाळून आदर्श विवाह होत आहे. हे कोळी समाज वधुवर पालक मेळाव्याचे फलित असल्याचे बोलले जात आहे. २३ डिसेंबर रोजी सामुहिक परिचय मेळावा होत असून यासाठी ५५१ वधुवरांची यात नोंदणी झाली आहे.
कोळी समाजातील लग्नकार्यात होणारा वारेमाप खर्च, मानपान, अनावश्यक चालीरीती यांना पायबंद बसावा म्हणून दोंडाईचा कोळी समाजाच्यावतीने २३ डिसेंबर रोजी कोळी समाज सामूहिक वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .
आजतागायत वधु- वर परिचय मेळाव्यात ५५१ वधु वरानी नोंदणी केल्याची माहिती वधुवर परिचय मेळावा समिती अध्यक्ष मनोज निकम व उपाध्यक्ष जयेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.
या समितीच्या प्रयत्नातून धुळे येथील दिनेश मुरार निकम यांचा मुलगा व अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे सरचिटणीस रमेश निकम यांचा पुतण्या चि.पियुष व शहादा तालुक्यातील जावदा येथील सुरेश बाजीराव शिरसाठ यांची कन्या कु.पुनम यांची विवाह बैठक नुकतीच झाली. हा विवाह हुंडा न घेता, मानपान व अनावश्यक चालीरीती झुगारुन होत आहे. विवाहात नवरदेव व नवरीचे कपडे (बस्ता) वरवधु पित्याने स्वत: घ्यावेत. सौंदर्य प्रसाधने स्वखर्चाने करावेत, जेवणावळ, मंडप, बँड व इतर बाबींचा खर्च वरपित्याने करावा. मानपानासाठी नारळ किंवा खोबरेवाटी देऊ नये. अशी आदर्श बोली बंधने बैठकीत संमत झालीत.
सदर आदर्श विवाह मेळावा समितीने घडवून आणला आहे, अशी माहिती मनोज निकम व जयेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.
या निमित्ताने वरवधू पित्यांचा सत्कार टोकरे कोळी समाज व वधुवर मेळावा समितीच्यावतीने समाज जिल्हाध्यक्ष प्रदीप नवसारे, रमेश निकम, समितीचे अध्यक्ष मनोज निकम, जयेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. आदर्श विवाह होत असल्याने समिती अध्यक्ष मनोज निकम, कोळी समाज जिल्हाध्यक्ष प्रदिप नवसारे, रमेश निकम, सुरेश कुवर, बाबुराव शिरसाठ, काशिनाथ चित्ते, सुकदेव चित्ते, गणेश निकम, आदिंनी समाधान व्यक्त केले.