भगवामय वातावरणात धुळ्यात क्रांती मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 02:53 PM2018-01-12T14:53:15+5:302018-01-12T14:55:05+5:30
घोषणाबाजींनी दुमदुमला परिसर : जिल्ह्यातील सकल मराठा व सर्वसमावेशक समाजबांधवांची उपस्थिती
लोकतम न्यूज नेटवर्क
धुळे : कोरेगाव भिमा प्रकरणानंतर धुळ्यात ३ रोजी एका विशिष्ट समूहाने मोर्चा काढला. त्यावेळी महापुरुषांचा अवमान होईल, अशा घोषणा देण्यात आल्या. शहरातील व्यापाºयांच्या दुकानांवर दगडफेक झाली. ज्यांचा या घटनेशी काडीमात्र संबंध नाही; त्यांना काही समाजकंटकांनी मारहाण केली. या घटनेचा निषेधार्थ शुक्रवारी धुळे जिल्ह्यातील सकल मराठा व सर्वसमावेशक समाजाच्या वतीने क्रांती मोर्चा पार पडला. मोर्चात सहभागी मोर्चेकºयांनी ‘जय जिजाऊ, जय शिवराय, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत शहरातील परिसर दुमदुमून सोडला.
शहरातील जुन्या आग्रारोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर हा मोर्चा खंडेराव बाजार, पाचकंदील चौक, कराचीवाला खुंट, मनपा, झाशीचा राणीचा पुतळामार्गे जुने प्रशासकीय संकुलापर्यंत आला. तेथे मोर्चाचा समारोप झाला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना संकल मराठा समाजातील वैष्णवी सूर्यवंशी, सायली काळे, ढीना ढबळे, साक्षी मोरे, वैशाली शिरसाठ, विद्या देसले या तरुणींच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. निवेदनात ३ रोजी निघालेल्या मोर्चात एका विशिष्ट समूहाने महापुरुष व अन्य महनीय नेत्यांच्या विरोधात अश्लिल घोषणाबाजी दिल्या. या अपकृत्याची दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. यावेळी अॅड. श्यामकांत पाटील, उद्योजक निरंजन भतवाल, गुलशन उदासी, साहेबराव देसाई, अनिल खंडेलवाल व समाजबांधव उपस्थित होते. मोर्चानिमित्त शहरातील चौकाचौकात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टिका
३ रोजी झालेला अन्याय यापुढे सहन करणार नाही, असे मनोज मोरे यांनी त्यांच्या मनोगतात सांगत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. बुधवारी निघालेल्या मोर्चात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यांनी गांभीर्याने संबंधित अपप्रवृत्तींवर कारवाई केली असती, तर हा उद्रेक आज झाला नसता, असे म्हटले.