शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथील लाचखोर ग्रामसेवक जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 10:55 AM2017-11-22T10:55:50+5:302017-11-22T10:56:36+5:30
टक्केवारीतून लाच : सरपंचासह मुलाविरुद्धही गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथील ग्रामसेवक प्रवीण जाधव याने ठेकेदाराच्या रस्ता कामातून टक्केवारीच्या हिशोबाने परस्पर पाच हजार रुपये कापून घेतले़ याप्रकरणी ठेकेदाराने दिलेल्या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ग्रामसेवकासह महिला सरपंच आणि त्यांच्या मुलाविरुध्द गुन्हा दाखल केला़ यात ग्रामसेवकाला मंगळवारी अटक केली आहे़
शिंंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथील २ लाख ९८ हजार ९६९ रुपयांचे रस्ता काँक्रेटीकरणाचे काम एका ठेकेदाराने घेतले होते़ कामातून पाच टक्केप्रमाणे रकमेची मागणी ग्रामसेवक आणि महिला सरपंच व त्याच्या मुलाने ६ सप्टेंबर रोजी ठेकेदाराकडे केली होती़ लाचेची मागणी १५ हजार आणि ५ हजार रुपये अशी करण्यात आली होती़ शेवटी तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले आणि ही ग्रामसेवकाने रक्कम परस्पर कापून घेतली़ हा प्रकार उजेडात आल्याबरोबर ठेकेदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर ग्रामसेवक प्रविण जाधव यांच्यासह वालखेड्याच्या सरपंच केवळबाई ठाकरे आणि त्यांचा मुलगा डॉ़ कैलास ठाकरे यांच्याविरुध्द धुळे शहर पोलीस स्टेशनला मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.