११ गावांचा जमीन वापर नकाशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:19 PM2018-12-24T12:19:18+5:302018-12-24T12:19:57+5:30
महापालिका : नगररचना विभागाकडून कार्यवाही सुरू, दरमंजुरीसाठी विषय येणार स्थायीत
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने हद्दवाढीतील गावांमध्ये गट जोडणीचे काम सुरू केले होते़ त्यानंतर जमिन वापराचा संपूर्ण नकाशा तयार करण्यासाठी सुमारे २ कोटी रूपयांच्या खर्चाची निविदा काढण्यात आली होती़ आता प्राप्त निविदांचा विषय दर मंजूरीसाठी स्थायी समितीच्या सभेत ठेवला जाणार आहे़
शहर हद्दवाढीत ११ गावांचा समावेश झाला आहे़ या गावांमधील संपूर्ण जमिन सध्या कोणत्या वापरात आहे, याचे ‘रेकॉर्ड’ तयार करण्यासाठी जमिन वापर नकाशा अर्थात डीपी प्लॅन तयार केला जाणार आहे़ त्यासाठी नगररचना विभागाकडून लवकरच निविदा काढली जाणार असून खासगी संस्थेस ते काम दिले जाणार आहे़
धुळे महापालिका क्षेत्रासाठी सुधारीत शहर विकास आराखडा लागू झाला आहे़ परंतु शहर हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या ११ गावांचा त्यात समावेश नाही़ त्यामुळे महापालिकेच्या शहर विकास आराखड्यात भविष्यात या गावांमधील जमिन वापराचा समावेश करावा लागणार आहे़ त्यादृष्टीने त्याबाबतची कार्यवाही सुरू केली जाणार आहे़ शासकीय वापर, निवासी, शेती, उद्याने, औद्योगिक वापराचा समावेश करून जमिन वापर नकाशे तयार करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली़ त्यानंतर मनपाकडून निविदाही काढण्यात आली़ त्यानुसार ४ निविदा प्राप्त झाल्याची माहिती सुत्रांनी दिली़ आता प्राप्त निविदा दर मंजूरीसाठी स्थायी समितीच्या सभेत ठेवल्या जाणार असून त्या मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरूवात होणार आहे़ जमिन वापर नकाशा तयार केल्यानंतर गावांचा विकास योग्य रितीने होणे सोयीचे होईल़
गावांसाठीच्या निधीचा प्रस्ताव प्रलंबित़़
रस्ता डांबरीकरण- ८३़४४ कि.मी.- ९२ कोटी, ९६ लाख ४७ हजार ६१०, रस्ता नूतनीकरण- ४१़७० कि.मी.- १२ कोटी ४० लाख ७ हजार ८२, सिमेंट रस्ते- ९़१ कि.मी.- १० कोटी ६० लाख ५२ हजार ६७३, गटारी- २८१़९६ कि.मी.- ९६ कोटी १० लाख ५१ हजार ४६०, संरक्षण भिंती- १८़९५ कि.मी.- १२४ कोटी ६३ लाख ३३ हजार ८५७, सार्वजनिक शौचालय- २३ युनिट- ३ कोटी ८४ लाख ७८ हजार ५००, सांडपाणी व्यवस्थापन- ७ कोटी ५४ लाख ९० हजार ७२१, एकूण- ३४९ कोटी ३८ लाख ४३ हजार २८९ रुपयांचा प्रस्ताव शासनाला सादर असून तो प्रलंबित आहे़