शास्तीमाफीसाठी थकबाकीदारांना आता तीन दिवसांसाठी शेवटची संधी
By देवेंद्र पाठक | Published: April 7, 2024 06:18 PM2024-04-07T18:18:48+5:302024-04-07T18:19:09+5:30
१० एप्रिलनंतर योजनेची मुदत संपणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
धुळे: शास्तीमाफीसाठी महापालिका प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत शेवटची संधी दिली होती. त्यात जे या संधीचा लाभ घेऊ शकले नसतील असे गृहित धरून १० एप्रिलपर्यंत ही मुदत वाढविण्यात आलेली आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी अंतिम तीन दिवस शिल्लक आहेत. ज्यांच्याकडे शास्ती बाकी असेल त्यांच्याकडून रोख रक्कम न घेता केवळ धनादेश स्वीकारला जात आहे. अशी माहिती वसुली अधीक्षक मधुकर निकुंभे यांनी दिली.
महापालिकेकडून वेळोवेळी थकबाकीदार असलेल्या मालमत्ताधारकांना सूट देण्यात आलेली आहे. थकबाकीची रक्कम वाढत असल्याने परिणामी शास्तीची देखील रक्कम वाढणे स्वाभाविक आहे. शास्ती माफीसाठी वेळोवेळी महापालिका प्रशासनाने सूट दिली होती. त्याचा लाभ घेण्यात आलेला असला तरी बहुतेकांनी याकडे साेईस्करपणे दुर्लक्ष केले होते. शहर आणि हद्दवाढीतील गावे मिळून १२६ कोटी पर्यंतची मागणी महापालिका प्रशासनाची हाेती. त्यात ३१ मार्चपर्यंत थकबाकीची रक्कम भरत असताना त्यांच्याकडील शास्ती माफ केली जाईल अशी योजना महापालिकेने आखली होती. १२६ कोटींपैकी नेमकी किती रक्कम मनपा तिजोरीत जमा झाली, हे १० एप्रिलनंतर स्पष्ट होईल. शास्ती माफ ही योजना केवळ ३१ मार्चपर्यंत होती. आता ही योजना बंद झाली आहे. शास्ती माफ होण्यासाठी रोख रक्कम न स्वीकारता केवळ धनादेश महापालिकेकडे जमा करावे लागतील. १० एप्रिलनंतर योजनेची मुदत संपणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
संधीचा लाभ घ्या
३१ मार्चपर्यंत शास्तीमाफीची योजना होती. त्यात अनेकांनी लाभ घेतला आहे. रोख रक्कम आणि धनादेश स्वीकारले जात होते. आता ३१ मार्च ओलांडल्यामुळे ही योजना बंद झाली. १० एप्रिलपर्यंत शास्तीमाफी योजना केवळ धनादेशासाठी राहणार आहे. धनादेशद्वारे शास्तीमाफी योजनेचा लाभ घेता येईल. नंतर ही देखील संधी मिळणार नाही.- अमिता दगडे पाटील, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका, धुळे.