अखेरच्या दिवशी १०१ उमेदवारांची माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 11:06 PM2018-11-26T23:06:01+5:302018-11-26T23:07:40+5:30
मनपा निवडणूक : एकूण १११ उमेदवारांचे अर्ज मागे, ७४ जागांसाठी ३५६ उमेदवार रिंगणात
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिका निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी दुपारी ३ वाजता संपली़ अखेरच्या दिवशी तब्बल १०१ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले़ तत्पूर्वी शनिवारी १० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले होते़ ४६७ पैकी १११ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ७४ जागांसाठी ३५६ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत़
मनपा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम १ नोव्हेंबरला जाहीर झाला होता़ त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या विहीत मुदतीत ७३८ अर्ज दाखल झाले होते़ छाननीअंती ४६६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले़ मात्र छाननीत उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने न्यायालयात गेलेल्या एका उमेदवाराचा अर्ज न्यायालयाने वैध ठरविला़ त्यामुळे ४६७ उमेदवार रिंगणात होते़ माघारीसाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती़ त्यात पहिल्या दिवशी १० तर दुसºया दिवशी १०१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले़
माघारीबाबत होती उत्सुकता
शहरातील विविध प्रभागांमधून उमेदवारी अर्ज मागे घ्यावे, यासाठी प्रमुख राजकीय पक्षांकडून स्वपक्षाच्या उमेदवारांच्या विरोधातील प्रतिस्पर्धी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी गळ घातली जात होती़ त्यासाठी विविध प्रलोभने दाखविण्यात आल्याचीही चर्चा आहे़ त्यामुळे कोणत्या प्रभागातून कोणता उमेदवार आपले अर्ज मागे घेतो, याची उत्सुकता असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये सकाळपासूनच गर्दी झाली होती़ काही उमेदवारांनी स्वखुशीने उमेदवारी मागे घेतली़ अखेरच्या दिवशी तब्बल १११ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे़
आजपासून प्रचाराची रणधुमाळी
महापालिका निवडणूकीसाठी आता सर्व पक्षांचे उमेदवार स्पष्ट झाल्याने आजपासून प्रचाराची रणधुमाळी रंगणार आहे़ अनेक उमेदवारांनी आपापल्या पक्षाचे पॅनल उभे करून एकत्रित प्रचार सुरू केल्याचे दिसून येत आहे़ तर काही अपक्षांनी स्वतंत्रपणे प्रचार सुरू केला आहे़
प्रचार ७ डिसेंबरला थांबणार असून ९ डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडेल़ तर १० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे़
माघार घेतलेले प्रमुख उमेदवाऱ़़
४ मनपा निवडणुकीत अर्ज भरलेल्या दिग्गजांनीही माघार घेतली़ त्यात हेमा अनिल गोटे (प्रभाग ९ ब), गंगाधर माळी (२ड), अमित दुसाणे (२ ड), संजय बोरसे (२ ड), रमेश बोरसे (४ ड), गुलशन उदासी (७ ड), पुनम परदेशी (८ क), विकी परदेशी (८ ड), महादेव परदेशी (८ ड), अमित खोपडे (८ ड), अरशद शेख (१२ क), सोनल शिंदे (१४ ड), माधुरी अजळकर (१६ क), प्रशांत नवले (१७ ड), मोहन नवले (१७ ड), संजय बगदे (१७ ड)़
महापालिका निवडणुकीत काही उमेदवारांना पक्षाने उमेदवारीचा शब्द देऊनही उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष दाखल केलेले अर्जही मागे घेत नाराजी व्यक्त केली़
१२ अ मध्ये राष्ट्रवादीचा अर्ज वैध ठरल्याने होणार निवडणूक
शहरातील प्रभाग क्रमांक १२ अ मध्ये चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते़ मात्र छाननीअंती तीन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने या प्रभागात समाजवादी पार्टीच्या अन्सारी फातमा नुरूल अमीन या एकमेव उमेदवार शिल्लक राहिल्या होत्या़ मात्र त्यांना विजयी घोषित करण्यात आलेले नव्हते़ शपथपत्रावर स्वाक्षरी नसल्याच्या कारणावरून उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवार अन्सारी फौजिया बानो यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती़ त्यानुसार न्यायालयाने त्यांचा अर्ज वैध ठरवला़ त्यामुळे या प्रभागात आता दोन उमेदवार रिंगणात असून निवडणूक होणार आहे़ त्यासाठी संबंधित जागेसाठीच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होणार असून त्यांना माघारीसाठी बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत वेळ दिली जाणार असल्याचे निवडणूक अधिकाºयांनी स्पष्ट केले़
२८ याचिका फेटाळल्या़़़
महापालिका निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या काही उमेदवारांचे अर्ज छाननीत अवैध ठरविण्यात आले होते तर काही उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांबद्दल घेतलेल्या हरकती फेटाळण्यात आल्या होत्या़ त्यामुळे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विविध कारणांनी एकूण २९ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या़ मात्र त्यातील २८ याचिका फेटाळण्यात आल्या असून केवळ प्रभाग १२ अ मधील फौजिया अन्सारी यांची याचिका मंजूर झाली़