हरकतींसाठी उद्या अखेरचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 06:11 PM2017-08-17T18:11:06+5:302017-08-17T18:12:46+5:30
डीपीडीसी निवडणूक : २१ पासून नामनिर्देशन अर्ज भरण्यास प्रारंभ; प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) नऊ जागांसाठी घेण्यात येणाºया निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादींवर हरकती नोंदविण्यासाठी शुक्रवारी, १८ रोजी अखेरचा दिवस राहणार आहे. दरम्यान, १६ रोजी मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अद्याप एकही हरकत प्राप्त झाली नसल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
जिल्हा नियोजन समितीवर दोंडाईचा येथील एका रिक्त पदासह २०११ च्या लोकसंख्येच्या निकषानुसार नऊ सदस्यांची निवड केली जाणार आहे.
ही निवडणूक घेण्यासाठी गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाºयांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दत्तात्रय बोरूडे यांची निवड केली होती; तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शुभांगी भारदे व मुरलीधर वाडेकर यांची निवड करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी स्वरुपात स्वीकारणार हरकती
या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे, जिल्हा परिषद, धुळे, धुळे शहर महानगरपालिका, धुळे, मुख्याधिकारी, नगरपरिषद, शिरपूर- वरवाडे, शिरपूर, जि. धुळे, मुख्याधिकारी, नगरपरिषद दोंडाईचा-वरवाडे, दोंडाईचा, ता. शिंदखेडा, जि. धुळे, मुख्याधिकारी, नगरपंचायत साक्री, जि. धुळे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, शिंदखेडा, जि. धुळे येथील सूचना फलकांवर १६ रोजी ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रसिध्द केलेल्या याद्यांबाबत कोणाच्याही काही हरकती, सूचना, असल्यास याद्या प्रसिध्द केल्याच्या तारखेपासून पुढील तीन दिवस म्हणजे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात लेखी स्वरूपात हरकत दाखल करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी निर्देश दिले आहेत.
डीपीडीसीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार २१ ते २४ दरम्यान नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यात येणार असून उमेदवारांना त्यांचे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात येऊनच जमा करावे लागणार आहे. प्राप्त झालेल्या अर्जांची २८ रोजी छाननी करण्यात येईल. यासंदर्भात सविस्तर निवडणूक कार्यक्रम येत्या दोन दिवसात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
- दत्तात्रय बोरूडे, निवडणूक निर्णय अधिकारी
तथा जिल्हा पुरवठा अधिकारी