भाजीपाला खरेदीसाठी लातूरचे व्यापारी शेतीबांधावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 05:51 PM2019-01-07T17:51:21+5:302019-01-07T17:52:59+5:30
ऐन दुष्काळात व भाव नसताना न्याहळोद परिसरातील शेतक-यांना मोठा दिलासा
लोकमत आॅनलाईन
न्याहळोद, ता.धुळे : ऐन दुष्काळात भाजीपाला व दुधास भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. नुकतेच गावात लातूर येथील व्यापारी कोथिंबीर व भाजीपाला खरेदीसाठी आले आहेत. ते स्थानिक बाजारपेठेपेक्षा जास्त भाव देत असल्याने शेतक-यांना मोठाच दिलासा मिळाला आहे.
यावर्षी पाऊस कमी असल्याने जास्त कालावधीचे पीक न घेता लवकर तयार होणा-या भाजीपाला पिकांकडे शेतकरी वळले आहेत. यामुळे शेतात भरपूर उत्पादन आल्याने बाजारात भाज्यांचे दर कमालीचे घसरले आहेत. प्रसंगी शेतमाल शेतातून काढून बाजारात नेण्याचा खर्च देखील निघत नाही. अशा स्थितीमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. मात्र नेमक्या याच कठीण प्रसंगात लातूर येथील व्यापारी भाजीपाला खरेदी करण्यासाठी गावात दाखल झाले आहेत. त्यांनी नुकतीच एक गाडी भरून कोथिंबीर शेतक-यांकडून खरेदी केली.
शेतातून भाजीपाला काढणा-या मजुरांचे पैसे देखील हेच व्यापारी देत असल्याने शेतक-यांच्या वाहतूक खर्चासह मजुरीच्या खर्चातही बचत झाली आहे. एरवी बाजारात भाजीपाला नेऊन त्यासाठीचा खर्च निघेल किंवा नाही, याची खात्री नसते. परंतु या व्यवहारात शेतात पीक उभे असतांनाच किती पैसे हातात मिळतील, याची खात्री असल्याने शेतकरी सुखावला आहे.
स्थानिक बाजारपेठेत विक्रीत स्पर्धा नसल्याने भाजीपाला मातीमोल भावाने विकला जात होता. पण परजिल्ह्याातून आलेल्या व्यापा-यांमुळे भाजीपाला उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या पार्श्वभूमीवर शेतक-यांनी एकजूट दाखवून जास्तीत जास्त भावाने शेतमाल विक्री केला तरच दोन पैसे हातात येतील. दुष्काळी परिस्थितीत लातूरचे व्यापारी आपल्या बांधावर पोहचले, ह्या संधीचे शेतक-यांनी सोने करावे, असे शेतकरी यशवंतराव माधवराव पाटील यांनी सांगितले.