धुळे जिल्ह्यात स्वच्छता महोत्सवास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 11:56 AM2019-07-06T11:56:21+5:302019-07-06T11:57:14+5:30
स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचा उपक्रम
आॅनलाइन लोकमत
धुळे : स्वच्छ भारत मिशन (ग्रापंचायत) या कार्यक्रमाला २ आॅक्टोबर २०१९ रोजी पाच वर्षे पूर्ण होत असल्याने, या कार्यक्रमाची उपलब्धी साजरी करणे आणि स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या स्वच्छता कार्यकर्त्यांची दखल घेण्यासाठी जिल्ह्यात स्वच्छता महोत्सव २०१९चे आयोजन करण्यात आले आहे. २४ जून पासून या महोत्सवास सुरूवात झाली असून, त्याचा समारोप २ आॅक्टोबरला होणार आहे.
स्वच्छता महोत्सव साजरा करतांना समुदायस्तरावर स्वच्छतेविषयी कामासाठी लोकसंघटन घडवून आणणे, समाजाच्या विभिन्न घटकातील स्वच्छता कार्यकर्त्यांचा सक्रीय सहभाग घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. स्वच्छता दर्पण ग्रामीणमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन ग्रामसेवक, तालुका समन्वयक, गटविकास अधिकारी यांच्यासाठी १ सप्टेंबर रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात येईल. हा दिवस स्वच्छ प्रेरक दिन म्हणून साजरा करण्यात येईल.
विविध उपक्रम राबविणार
या कार्यक्रमांर्तग स्वच्छतेच्या विषयावर प्रदर्शन भरविणे, स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाची उपलब्धी साजरी करणे, स्वच्छतेच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार करणे, त्यांना पुरस्कार देणे, स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करून स्वच्छ सुंदर शौचालय दिन साजरा करणे, उत्कृष्ट काम केलेल्या सरपंच, आणि लाभार्थी यांचा सत्कार करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या महोत्सवात जिल्ह्याप्रमाणेच राज्यस्तरावरदेखील सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वाघ यांनी केले आहे.