धुळ्याच्या न्यायालय आवारात वकीलास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 07:31 PM2019-04-20T19:31:45+5:302019-04-20T19:32:10+5:30
गुन्हा दाखल : वकील संघाकडून निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : कागदपत्रांची फाईल वकील पाहत असताना त्याला विरोध करत त्यांना मारहाण झाल्याची घटना शनिवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी वकील संघाकडून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे़ तर संशयिताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़
एका सोसायटीतील अपहार प्रकरणात फिर्यादी अनिल गंजीधर पवार आहेत़ तर या प्रकरणातील आरोपींचे अॅड़ संजय बाविस्कर हे वकील आहेत़ या अनुषंगाने बाविस्कर फाईल बघत असताना त्याला विरोध करण्यात आला़ यावेळी शाब्दीक चकमक देखील झाली़ यानंतर न्यायालयात आवारात त्याचे पडसाद उमटले आणि अॅड़ बाविस्कर यांची गच्छी धरुन त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्नही झाला़ घटनेचे गांभिर्य ओळखून अन्य वकीलांनी हे भांडण सोडविले़
यानंतर हे प्रकरण थेट शहर पोलीस ठाण्यात पोहचले़ याठिकाणी अॅड़ संजय बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित अनिल गंजीधर पवार याच्या विरोधात भादंवि कलम ३२४, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
या घटनेचे पडसाद न्यायालयात उमटले़ तातडीने धुळे वकील संघाची बैठक घेण्यात आली़ यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अॅड़ दिलीप पाटील, अॅड़ विवेक सूर्यवंशी, अॅड़ अमित दुसाने, अॅड़ गजेंद्र भदाणे, अॅड़ राजेंद्र गुजर, अॅड़ अतुल भारती, अॅड़ राहुल येलमामे, अॅड़ शैलेश राजपूत, अॅड़ सुनील देवरे, अॅड़ अतुल जगताप, अॅड़ प्रतिभा मोरे, अॅड़ पल्लवी गायकवाड यांच्यासह अन्य उपस्थित होते़ बैठकीत मारहाण घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला़ वकील बांधवांची सुरक्षितता यावर देखील चर्चा करत असताना अॅडव्होकेट प्रोटेशन अॅक्टची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आली़
मारहाण करणारा अनिल गंजीधर पवार याचे वकीलपत्र कोणीही स्विकारणार नाही आणि यासंदर्भात पुढील ठोस भूमिका सोमवारी ठरविली जाईल़
- अॅड़ दिलीप पाटील
अध्यक्ष, वकील संघ, धुळे