कॉपर केबल लंपास करणारी टोळी एलसीबीने पकडली
By देवेंद्र पाठक | Published: July 25, 2023 09:59 PM2023-07-25T21:59:07+5:302023-07-25T21:59:43+5:30
चार जणांना अटक, दोन लाखांवर मुद्देमाल हस्तगत.
देवेंद्र पाठक, धुळे: साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरातील कॉपर केबल लंपास करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. चौघांना ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, शिवाय २ लाख १५ हजार ८३२ रुपयांचा मुद्देमालही पोलिसांना काढून दिला.
साक्री तालुक्यातील सालटेक शिवारात ३ मे ते २१ जुलै या कालावधीत मोठ्या प्रमाणावर कॉपर केबल चोरट्यांनी लंपास केली आहे. या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. निजामपूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचा संयुक्त तपास सुरू असताना, गोपनीय माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच, कॉपर केबल चोरल्याची कबुली दिली, शिवाय २ लाख १५ हजार ८३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी लहानू काशिनाथ सरक (वय २२, रा.अजनदरा ता.साक्री), संजय मानू मारनर (वय २४, रा.अंबापूर ता.साक्री), एकनाथ सखाराम वाघमोडे (वय २५, रा.वाघापूर ता.साक्री) भैय्या उर्फ सुनील काशिराम सरक (वय २३, रा.महिर ता.साक्री) या चाैघांना अटक करण्यात आली.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील, कर्मचारी संदीप सरग, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, किशोर पाटील, कैलास महाजन, राजू गीते यांनी कारवाई केली.