अवैध गॅस पंपावर ‘एलसीबी’चा छापा, दोघांवर आझादनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
By अतुल जोशी | Published: December 13, 2023 05:07 PM2023-12-13T17:07:58+5:302023-12-13T17:08:59+5:30
धुळे : शहरातील नटराज टॅाकीजजवळील रमजानबाबा नगरातील अतिक्रमण केलेल्या घरामध्ये सुरू असलेल्या अवैध मिनी गॅसपंपावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ...
धुळे : शहरातील नटराज टॅाकीजजवळील रमजानबाबा नगरातील अतिक्रमण केलेल्या घरामध्ये सुरू असलेल्या अवैध मिनी गॅसपंपावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या ठिकाणाहून दोन जणांना ताब्यात घेतले; तसेच दोन सिलिंडर, रिक्षासह दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.
शहरातील रमजानबाबा नगरातील उस्मानिया मस्जिदजवळ अतिक्रमण केलेल्या घरामध्ये साबीर शहा भोलू शाह (वय ४४, रा. रमजानबाबानगर, ८० फुटी रोड) हा बेंकायदेशीररीत्या घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅस वाहनांमध्ये इंधन म्हणून भरून देत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने मंगळवारी सायंकाळी छापा टाकला. तेव्हा तेथे एका विनाक्रमांकाच्या रिक्षामध्ये घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस भरताना दोनजण रंगेहात सापडले. पोलिसांनी या ठिकाणाहून गॅस भरून देणारा साबीर शहा भोलू शहा (४४) व रिक्षामालक मोहम्मद कामराण गुलाम हमीद (वय २७, रा. मछली बाजार, मालेगाव) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सिलिंडरचा कुठलाही परवाना आढळून आला नाही.