मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्षेत नेते, मात्र विमानाचं लॅन्डींगच नाही; सगळेच माघारी गेले
By अतुल जोशी | Published: April 5, 2024 09:03 PM2024-04-05T21:03:42+5:302024-04-05T21:04:02+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी आमदार मंजुळा गावित यांच्याकडे विवाह सोहळ्यानिमित्त मुंबईहून विमानाने येणार होते
धुळे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका विवाह सोहळ्यानिमित्ताने विमानाने धुळ्याला येणार होते. मात्र धुळे विमानतळावर रात्रीच्यावेळी विमान उतरण्याची सुविधा नसल्याने, ते जळगावला गेले. तेथून रस्ता मार्गे धुळ्याला आले. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्षेत मंत्रीसह खासदारांनाही विमानतळावरून माघारी जावे लागले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी आमदार मंजुळा गावित यांच्याकडे विवाह सोहळ्यानिमित्त मुंबईहून विमानाने येणार होते. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, आमदार अमरिशभाई पटेल, चंद्रकांत रघुवंशी, अविष्कार भुसे यांच्यासह अनेक नेते दुपारी साडेचार वाजेपासूनच विमानतळावर दाखल झालेले होते. तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता. मुख्यमंत्री सायंकाळी ५.१५ वाजता येथे येणे अपेक्षित होते.
धुळे येथील विमानतळावर सायंकाळी ६ नंतर विमान उतरण्याची सुविधा नाही. त्यामुळे पावणेसात वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे विमान परस्पर जळगावला गेल्याचा सिग्नल मिळाला. मुख्यमंत्री जळगावहून रस्ता मार्गे धुळ्याला येणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर पदाधिकारी, पोलिस अधिकारी, कर्मचारी विमानतळाच्या बाहेर पडले.