धुळयातील तापी योजनेच्या जलवाहिनीला सोनगिरजवळ गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 11:55 AM2018-07-28T11:55:57+5:302018-07-28T11:57:09+5:30
हजारो लिटर पाण्याची नासाडी, महामार्ग एका बाजूने बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शहराच्या ६० टक्के भागाला पाणीपुरवठा करणाºया तापी योजनेच्या मुख्य जलवाहिनीला शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मोठी गळती लागली़ सदर जलवाहिनी मुंबई-आग्रा महामार्गालगत असल्याने गळतीतून कारंज्याव्दारे आठ ते दहा फुट उंच उडत असलेले पाणी महामार्गावर उडत होते, त्यामुळे एका बाजूने वाहतूक बंद करण्यात आली होती़
या गळतीची माहिती मिळताच तापी योजनेवरून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असला तरी जलवाहिनीतील पाणी संपेपर्यंत गळती थांबणार नाही़ मनपाचे अधिकारी सोनगिरकडे रवाना झाले आहेत़ दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेतले जाणार आहे़ काही दिवसांपूर्वी सुलवाडे बॅरेजमधील पाणीसाठा घटल्याने शहरात १५ दिवस कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती़ त्यानंतर पुन्हा एकदा शहराचा पाणी पुरवठा खंडीत झाला आहे़ सोनगिरजवळ लागलेल्या गळतीतून हजारो लिटर पाणी वाहत असून त्याठिकाणी बघ्यांची गर्दी झाली आहे़ घटनास्थळी पोलीसही दाखल झाले आहेत़