जिल्हा रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरला गळती; २ महिने शस्त्रक्रिया थांबल्या

By भुषण चिंचोरे | Published: September 5, 2022 06:23 PM2022-09-05T18:23:14+5:302022-09-05T18:23:48+5:30

शस्त्रक्रिया विभागाचे छत दुरुस्त करावे यासाठी जिल्हा रुग्णालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दोन पत्रे पाठवली आहेत

leakage to the operation theater of the Dhule district hospital; Surgery stopped for 2 months | जिल्हा रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरला गळती; २ महिने शस्त्रक्रिया थांबल्या

जिल्हा रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरला गळती; २ महिने शस्त्रक्रिया थांबल्या

Next

धुळे : शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागाला पावसामुळे गळती लागली असून, गेल्या दोन महिन्यांपासून डोळ्यांच्या शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. शस्त्रक्रिया विभागाच्या छताची दुरुस्ती करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांचन वानेरे यांनी दिली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शस्त्रक्रिया सुरू होत्या. मात्र, त्यानंतर झालेल्या दमदार पावसामुळे शस्त्रक्रिया विभागाच्या छताला गळती लागली व शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्या. त्यानंतर दोन महिने उलटले तरी मोतीबिंदू, काचबिंदूची एकही शस्त्रक्रिया झालेली नसल्याने रुग्णांच्या डोळ्यासमोर अंधार पसरल्याचे चित्र आहे.

एप्रिल ते जुलैपर्यंत - ५५ शस्त्रक्रिया 

एप्रिल ते जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्हा रुग्णालयात ५५ रुग्णांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यात मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रियांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात सर्वाधिक २४ रुग्णांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

पाच ऑगस्टला पाठवले पहिले पत्र
शस्त्रक्रिया विभागाचे छत दुरुस्त करावे यासाठी जिल्हा रुग्णालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दोन पत्रे पाठवली आहेत. ५ ऑगस्ट रोजी पहिले पत्र देण्यात आले हाते. त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी दुसरे पत्र देण्यात आले आहे. मात्र, बांधकाम विभागाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. दरम्यान, जुलै महिन्यात गळती लागलेली असताना दुरुस्तीबाबत ऑगस्ट महिन्यात पत्र देण्यात आल्याने जिल्हा रुग्णालयाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

निर्जंतुकीकरण सुरू : छताची दुरुस्ती झालेली नसतानाच शस्त्रक्रिया विभागाचे निर्जंतुकीकरण सुरू करण्यात आले असून, स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. स्वॅब निगेटिव्ह आल्यानंतर शस्त्रक्रिया सुरू झाल्या तरी परतीच्या पावसात छत गळाले तर पुन्हा शस्त्रक्रिया थांबवण्याची वेळ येणार आहे.

शस्त्रक्रिया विभागाच्या छताला गळती लागल्याने शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्या आहेत. छताची दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देण्यात आले आहे. - डॉ. कांचन वानेरे, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: leakage to the operation theater of the Dhule district hospital; Surgery stopped for 2 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.