अडचणींचा सामना करा, आनंदाने जीवन जगायला शिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 10:25 PM2019-10-04T22:25:54+5:302019-10-04T22:26:19+5:30
साक्रीत शारदोत्सव व्याख्यानमाला : सांगा कसं जगायचं? विषयावर तुषार चांदवडकर यांचे प्रतिपादन
साक्री : आपण दैनंदिन जीवन जगत असताना अनेक वेळा नकारात्मक बाबींचा अधिक विचार करुन स्वतच स्वत:साठी त्रास ओढवून घेत असतो. मात्र, यातून अनेक आनंदी क्षणांना आपण मुकतो़ अशावेळी येणाºया अडचणीचा नकारात्मकतेने नाही तर सकारात्मकतेने सामना केला पाहिजे. तसेच आयुष्य हे अडचणी कुरवाळत कण्हत कण्हत नाही तर त्यावर मात करुन आनंदाने जगता आले पाहिजे, असे मत नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील प्रा. डॉ. तुषार चांदवडकर यांनी व्यक्त केले.
येथील श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या १९ व्या शारदोत्सव व्याख्यानमालेत ‘सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाण म्हणत’ या विषयावर चौथे पुष्प गुंफताना प्रा. चांदवडकर बोलत होते.
यावेळी डॉ. डी. पी. पाटील अध्यक्षस्थानी होते. तर उपाध्यक्ष सुरेश सोनवणे, कार्यवाह प्रा. व्ही. के. शहा, सहकार्यवाह प्रा. डी. एन. खैरनार, प्रा. एल. जी. सोनवणे, संचालक आबा सोनवणे, आर. डी. भामरे, अजीज खा पठाण, जितेंद्र मराठे, सांस्कृतिक समिती प्रमुख विजय भोसले, सचिव पी. झेड. कुवर उपस्थित होते.
यावेळी प्रा. डॉ. चांदवडकर यांनी मंगेश पाडगांवकर यांच्या कवितेतील ‘सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत कि गाण म्हणत’ या ओळींचे विमोचन करत अनेक घटनांचे दाखले दिले. यात प्रामुख्याने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगुळकर आदिंच्या आयुष्यातील विविध अडचणींवर त्यांनी कशा पद्धतीने सकारात्मकतेने मार्ग काढला याची उदाहरणे त्यांनी यावेळी दिली. तसेच आपल्या जीवनातील आनंद हिरवणाºया गोष्टी आपणच दूर करुन जीवन सकारात्मकतेने व आनंदाने जगण्याचा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी अॅड. उत्तमराव मराठे, डॉ. जयवंतराव अहिरराव, डॉ. विजया अहिरराव, प्रा. डॉ. सतीश म्हस्के, राजन पवार, एन. झेड. बोरसे, शरद मोरे, आत्माराम गांगूर्डे, सीमा सोनवणे, विद्या बोरसे, अनिता खैरनार, दीपक कुवर, नरेंद्र खैरनार, शर्मिला भोसले आदींसह श्रोते उपस्थित होते. आजचे लकी श्रोते डॉ. दिलीप लोखंडे हे ठरले. पुस्तक भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्याख्यानमाला यशस्वितेसाठी ग्रंथपाल उज्ज्वल अग्निहोत्री, राजेंद्र सोनार, प्रकाश कुवर, श्री. गवांदे, श्री. नांद्रे, शोभा लाडे आदींसह वाचनालयाच्या कर्मचाºयांनी परिश्रम घेत आहेत. व्याख्यानमालेचे पुष्प शनिवारी देखील गुंफण्यात येईल़