बिबट्या शेतविहिरीत पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 10:45 PM2019-03-08T22:45:34+5:302019-03-08T22:45:50+5:30
बाहेर काढण्याचे प्रयत्न : धुळे तालुक्यातील चौगाव शिवारातील घटना
धुळे : तालुक्यातील चौगाव शिवारात एका शेतविहिरीत बिबट्या पडला असून त्यास काढण्यासाठी पिंजरा मागविण्यात आला असून तो खाली सोडण्याचे निकराचे प्रयत्न वनविभागाकडून उशीरापर्यंत सुरू होते.
चौगाव शिवारात दशरथ लुका शिरसाठ यांच्या मालकीचे शेत असून त्यात बिबट्या पडल्याचे दुपारी लक्षात आले. त्यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. वनविभागाचे सहायक वनसंरक्षक संजय पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे, किरण माने, चौगावच्या वनपाल सविता पाटील, वनपाल विशाल जाधव, वनरक्षक सुनील पाटील, भामरे, वनरक्षक वृषाली अहिरे आदी घटनास्थळी पोहचले. विहीर खोल असल्याने तसेच पिंजरा अवजड असल्याने तो खाली विहिरीत सोडण्यासाठी मोठी क्रेन मागविण्यात आली होती. यावेळी बिबट्यास पाहण्यासाठी गर्दी झाली होती.
रात्री अंधार झाल्याने पिंजरा सोडताना अडचणी येत होत्या. मात्र बॅटरींच्या सहायाने पिंजरा सोडण्याचे प्रयत्न सुरू होते. बिबट्यास पकडून दूर जंगलात सोडण्यात यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.