भगिनी सन्मान योजनेकडे महिला बचत गटांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 11:29 AM2017-10-08T11:29:31+5:302017-10-08T11:31:55+5:30
विभागातील १३पैकी फक्त ३ बसस्थानकांसाठी ९ अर्ज प्राप्त, अपेक्षित प्रचार झालाच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दिवाळीनिमित्त महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू बसस्थानकावर विक्री करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने ‘भगिनी सन्मान योजना’ सुरू केली. मात्र धुळे विभागात या योजनेला अपेक्षित प्रतिसादच मिळालेला नाही. विभागातील १३ पैकी फक्त तीन बसस्थानकांसाठी अवघे ९ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती विभागीय कार्यालयातून मिळाली आहे.
राज्य परिवहन महामंडळातर्फे दिवाळीनिमित्त प्रथमच ही योजना ८ ते २२ आॅक्टोंबर २०१७ या कालावधीत राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत केवळ महिला स्वयंसहायता बचत गटांना तात्पुरत्या स्टॉलसाठी बसस्थानकावर १०० चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी नाममात्र एक रूपया फी आकारण्यात येणार आहे. एका बसस्थानकावर पाच स्टॉल लावण्याची मुभा होती.
स्टॉल लावण्यासाठी महिला स्वयंसहायता बचत गटांना ४ आॅक्टोबरपर्यंत विभागीय कार्यालयात अर्ज करावयाचे होते. परंतु धुळे विभागात ‘भगिनी सन्मान योजनेकडे’ महिला बचत गटांना पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
विभागात धुळ्यासह साक्री, नंदुरबार, शहादा, शिरपूर, अक्कलकुवा, शिंदखेडा, नवापूर, दोंडाईचा, पिंपळनेर, तळोदा, चिमठाणा, धडगाव ही १३ प्रमुख बसस्थानके आहेत.
मात्र या योजनेसाठी धुळ्यातून फक्त एक व महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी यांच्याकडून नंदुरबार व तळोद्यासाठी प्रत्येकी चार-चार अर्ज प्राप्त झालेले आहेत. उर्वरित १० बसस्थानकांवर स्टॉल लावण्यासाठी एकाही बचत गटाचा अर्ज प्राप्त झालेला नाही. म्हणजे १३ पैकी फक्त तीनक बसस्थानकावर स्टॉल लावण्यासाठी अवघे ९ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
स्टॉल लावण्यासाठी ज्या प्रमाणात प्रचार, प्रसार होणे गरजेचे होते, त्या प्रमाणात तो झालेला नाही. परिणामी अनेक महिला बचत गटांपर्यंत ही योजनाच पोहचली नाही. योजनेची माहिती नसल्याने, बचत गटांनीही त्यासाठी अर्ज केला नसल्याचे चित्र आहे.
बचत गटांना फराळ, वस्तू विकण्याची मुभा
या योजनेंतर्गत महिला बचत गटांना दिवाळीसाठी तयार केलेले फराळाचे पदार्थ तसेच पणत्या, आकाश कंदिल, साबण, उटणे, लाडू, अनारसे, आदी वस्तू विक्री करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.
या स्टॉलच्या माध्यमातून व्यावसायिक संस्थांनी तयार केलेल्या पदार्थांची विक्री मात्र बचत गटांना करता येणार नसल्याचे पत्रकात म्हटलेले आहे.