गोवर्धन डोंगरावर पेटला वणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 08:46 PM2020-05-17T20:46:15+5:302020-05-17T20:46:33+5:30
लामकानी : पन्नास हेक्टरमध्ये जंगलाचे नुकसान, दोन तासांनी दाखल झाले अग्नीशमन दल, ग्रामस्थांनी विझवली आग
लोकमत न्यूज नेटवर्क
लामकानी : धुळे तालुक्यातील लामकानी वन क्षेत्रामध्ये चिंचवार रस्त्याच्या पश्चिमेला गोवर्धन डोंगरावर रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमाराला वणवा पेटल्याने जंगलाचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे़
लामकानी वनक्षेत्रामध्ये गवताचे प्रमाण जास्त आहे़ उन्हाळ्यामुळे गवत कोरडे झाले आहे़ तापमानाचा पारा वाढल्याने कोरड्या गवताने पेट घेतल्यामुळे वणवा पेटला असावा असा प्राथमिक अंदाज आहे़
सायंकाळी साडेचार वाजेला वणवा पेटला त्यावेळी उन्हाचे चटके जाणवत होते़ डोंगराला आग लागल्याचे निदर्शनाला येताच गावकऱ्यांनी तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेतली़ वन विभागाचे कर्मचारी देखील तातडीने दाखल झाले़ धुळे येथे अग्नीशमन दलाला दूरध्वनीवरुन वणवा पेटल्याचे माहिती देण्यात आली़ तत्पूर्वी गावकºयांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले होते़ माती आणि गोणपाट, कापडांचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे अथक प्रयत्न तरुणांनी केले़ परंतु वाºयाचा वेग अधिक असल्याने एका ठिकाणची आग विझवली तर दुसºया ठिकाणी आग लागत होती़ तब्बल दोन तास आगीचे तांडव सुरु होते़ गवत कोरडे असल्याने आमीचे लोळ आणि धूर यांमुळे वन क्षेत्रामध्ये कार्बनडाय आॅक्साईडचे प्रमाण वाढले होते़ आग विझविण्यास अडचणी येत होत्या़ परंतु वन विभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेवून आग अटोक्यात आणली़
दरम्यान, आगीची माहिती तात्काळ देवूनही अग्नीशमन दलाचे जवान तब्बल दोन तास उशिरा म्हणजे सव्वा सहा वाजेच्या दरम्यान एका बंबासह दाखल झाले़ तोपर्यंत आग अटोक्यात आली असल्याने ग्रामस्थांनी नारोजी व्यक्त केली़
जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
या वणव्यात जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे़ तब्बल पन्नास ते साठ हेक्टरवरील जंगलाला आग लागल्याने गवत आणि झाडे जळून खाक झाली आहेत़ तसेच ससे, साप, पक्षी, प्राणी मोठ्या प्रमाणावर आगीच्या भक्षस्थानी पडल्याचा अंदाज आहे़ त्यांची आश्रयस्थाने देखील नष्ट झाली आहेत़ या आगीत लामकानी परिसरात जंगलाचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे़ वन विभागाचे कर्मचारी सोमवारी पंचनामा करणार असून जंगलात नेमके किती नुकसान झाले हे त्यानंतरच स्पष्ट होणार आहे़ वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना माहिती कळविण्यात आली आहे, असे कर्मचाºयांनी सांगितले़