चलो बुलावा आया है !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:53 PM2019-04-16T12:53:54+5:302019-04-16T12:54:29+5:30
सप्तश्रृंगी गड : जिल्ह्यातून हजारो भाविक रवाना
धुळे : जिल्ह्यासह शहरातील भाविक दरवर्षी मोठ्या उत्साहाने सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी गडावर पदयात्रेने मार्गस्थ होतात़ यंदाही गडावर जाणाºया भाविकांची अक्षरश: रिघ लागली आहे. शहरात ठिकठिकाणी भाविकांसाठी महाप्रसाद, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़
सप्तश्रृंगी मातेच्या गडावर चैत्र यात्रोत्सवासाठी जिल्हाभरातील भाविक पदयात्रेने जाण्याची परंपरा आहे. यंदाही आठवडाभरापूर्वीपासून भाविक गडाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत़ यंदाही मातेच्या गडावर ध्वज लावण्याची परंपरा शिरपूरच्या जय मातादी पदयात्रा समितीतर्फे कायम राखली जाणार आहे़ लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व भाविक रणरणत्या उन्हात शेकडो किलोमीटरचे आंतर पार करून चैत्र पौर्णिमेला गडावर पोहचतात़ रस्त्यात डिजे, ढोलताशे, पारंपारिक वाद्यांच्या गजरात नृत्य करीत, हातात भगवे झेंडे घेऊन भाविक वाटचाल करतात़ उन्हाची पर्वा न करता भक्तीभावात तल्लीन होऊन वाटचाल करणाºया या भाविकांसाठी ठिकठिकाणी भाजी भाकरी, मसालेभात, उसळ, पोहे यासह विविध पदार्थ व थंडपाणी, सरबत, उसाच्या रसाची व्यवस्था केली जाते़ पदयात्रा केल्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होत असल्याची श्रध्दा असल्याने तरूणांसह महिला, वृध्द, लहान मुले देखील मोठ्या उत्साहाने या पदयात्रेत सहभागी होऊन सप्तश्रृंगी देवीच्या चरणी नतमस्तक होतात़ त्याठिकाणी मोठा यात्रोत्सवही असतो़
निजामपूर येथून भाविक रवाना
निजामपूर येथून सलग १९ व्या वर्षी २०० तरुण श्री सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी सोमवारी सकाळी पायी दिंडीने निघाले. १५ एप्रिल रोजी सकाळी मारोती मंदिरावर भाविक तरुण जमले होते. बजरंगबलीचे दर्शन घेऊन वाजत-गाजत पायी दिंडी मार्गस्थ झाली. येथील जयश्रीराम गणेश मंडळ, आई तुळजा भवानी मंडळ, भोई मित्र मंडळ, एकलव्य मित्र मंडळाचे सुमारे २०० तरुण या पायी दिंडीत सहभागी झाले आहेत.
१५ रोजी कासारे, पिसोळबारी मार्गे सोमपूर मुक्काम व तेथून सटाणा, विठेवाडीहुन १७ रोजी सप्तशृंगी गडावर भाविक पोहोचतील, अशी माहिती भैय्या गुरव यांनी दिली. गणेश बेंद्रे, ज्ञानेश्वर गुरव, उद्धव मराठे, मनोज मोरे, मुकेश राणे, प्रशांत मोरे आदींचा यात प्रमुख सहभाग आहे़
वर्षी फाट्यावर अल्पोपहार
सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी जाणाºया भाविकांसाठी शिंदखेडा तालुक्यातील वर्षी फाट्यावर अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती़
दरवर्षी मध्यप्रदेश, शिरपूर, बोराडी परिसरातून भाविक मोठ्या संख्येने पदयात्रेने गडावर दाखल होतात़ पदयात्रेत भरवाडे येथील ३ फुट उंचीचे झामरू कोळी सहभागी झाले आहेत. ते आपल्या दोन लहान भावांसह सलग पाच वर्षापासून या पदयात्रेत सहभाग घेत आहेत.