महाराष्ट्राला लुटलेले वैभव प्राप्त करून देऊ, धुळ्यातील सभेत उद्वव ठाकरे यांचे आश्वासन
By अतुल जोशी | Published: May 7, 2024 09:07 PM2024-05-07T21:07:49+5:302024-05-07T21:09:17+5:30
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. मात्र याच पंतप्रधानांच्या काळात देशातील महिला सुरक्षित नाही. मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर त्या राज्यात पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी साधी भेटही दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला."
धुळे : गेल्या दहा वर्षात गुजरातच्या दोघांनी महाराष्ट्राला लुटले आहे. मात्र इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेत आल्यावर लुटलेले वैभव पुन्हा महाराष्ट्रात आणले जाईल असे आश्वासन उद्ववसेनेचे प्रमुख उद्वव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत दिले.
मंगळवारी दुपारी जेलरोडवर सभा झाली. आपल्या अवघ्या १२ मिनिटाच्या भाषणात ते म्हणाले, . गेल्यावेळी आमच्या माध्यमातून महाराष्ट्रातून जास्त खासदार दिले होते. त्यामुळे मोदी पंतप्रधान झाले. मात्र यावेळी महाराष्ट्रातून त्यांना दिल्लीत पोहचू देणार नाही. देशाची राज्यघटना बदलविण्यासाठीच ४०० पारची घोषणा केली जात आहे. मात्र घटनेचे आपल्याला संरक्षण करावेच लागेल असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. मात्र याच पंतप्रधानांच्या काळात देशातील महिला सुरक्षित नाही. मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर त्या राज्यात पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी साधी भेटही दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.