अनकवाडी सरपंच खून खटल्यात १४ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2023 10:49 PM2023-11-08T22:49:11+5:302023-11-08T22:49:14+5:30
या घटनेत सरपंच पितांबर चव्हाण यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला.
राजेंद्र शर्मा
धुळे : तालुक्यातील अनकवाडी येथील सरपंच पितांबर दौलत चव्हाण (५५) यांच्या खूनप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश डॉ. एफ. ए. एम. ख्वाजा यांनी बुधवारी १४ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
अनकवाडी येथे २०१४ मध्ये झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीच्या वादातून नंदू खिळे यांच्यासह १४ जणांनी सरपंच पितांबर दौलत चव्हाण (५५) यांच्यासह त्यांचा मुलगा पृथ्वीराज पितांबर चव्हाण (१८) या दोघांवर १८ मे २०१६ रोजी रात्री साडेनऊ वाजता प्राणघातक हल्ला केला होता.
या घटनेत सरपंच पितांबर चव्हाण यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यावर १४ आरोपींविरोधात जिल्हा न्यायालयात कामकाज चालले. त्यात जिल्हा सत्र न्यायाधीश डाॅ. एफ. ए. एम. ख्वाजा यांनी ८ नोव्हेंबर २०२३ रोजी १४ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठाविली आहे. सरकारी पक्षातर्फे ॲड. देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांनी कामकाज पाहिले. जन्मठेप ठोठावलेल्या आरोपींमध्ये नंदू गोविंद खिळे (३८), दीपक गोविंद खिळे (३०), कौतिक चिंतामण खिळे (६०), प्रवीण अमृत क्षीरसागर (२९), हिलाल नारायण मोरे(५७), भटू वामन निंबाळकर(५९), रमेश वामन निंबाळकर (४४), सागर कारभारी खिळे (२३), गणेश महादू मोरे (२३), धनंजय उर्फ धनराज रोहिदास मोरे (२८), विनायक कौतिक खिळे (३५), कारभारी चिंतामण खिळे (४८), पांडुरंग कौतिक खिळे (२७), शरद गोविंद खिळे (२८) यांचा समावेश आहे. खटल्यांत ॲड. देवेंद्रसिंह तवर यांनी सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासले.
याप्रकरणात विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायाधीश डाॅ. एफ. ए. एम. ख्वाजा यांनी स्वतः हाॅटेलवरचे सी.सी.टी.व्ही फुटेज असलेली सी.डी. ही प्रत्यक्ष चष्मा, भिंग व जवळून डीव्हीडीद्वारे पाहिली. त्यात कुणाचेच चेहरे स्पष्ट दिसले नाहीत, कोण ते समजून आले नाहीत असे मत नोंदविले. त्यामुळे न्यायालयाने आरोपी नंदू खिळे याचा बचाव युक्तिवाद ग्राह्य मानला नाही.