दुचाकीचा कट लागल्याने खून करणाऱ्या चौघांना जन्मठेप
By देवेंद्र पाठक | Published: December 21, 2023 10:10 PM2023-12-21T22:10:45+5:302023-12-21T22:10:59+5:30
सनी साळवे प्रकरण : पुराव्यांअभावी तिघे निर्दोष, धुळे न्यायालयाचा निकाल
धुळे: प्रशांत उर्फ सनी प्रकाश साळवे खूनप्रकरणी न्यायालयाने चौघा संशयितांना जन्मठेपेची शिक्षा गुरुवारी ठोठावली. तर पुराव्याअभावी तिघांची निर्दोष मुक्तता केली. न्यायाधीश डी. एम. आहेर यांनी हा निकाल सुनावला. निकाल देताच मयत सनी याचे आई-वडील भावूक झाले होते. बहुचर्चित असलेल्या प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते.
देवपुरातील चंदन नगरातील रहिवासी सनी साळवे (वय १६, रा. चंदननगर, देवपूर धुळे) व त्याचा मित्र सुमेध सूर्यवंशी यांच्यावर १८ एप्रिल २०१८ रोजी मोटारसायकलीचा कट लागल्याच्या कारणावरून खुनी हल्ला करण्यात आला होता. धारदार शस्त्राने वार झाल्याने गंभीर अवस्थेत सनी याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा दुसऱ्या दिवशी सकाळी मृत्यू झाला. वाढीव कलमानुसार खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
घटनेनंतर फरार झालेल्या संशयितांच्या मुसक्या धुळे पोलिसांनी टप्प्याटप्प्याने आवळल्या होत्या. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने साक्षी आणि पुरावे तपासून जितू फुलपगारे (वय २२), दीपक फुलपगारे (वय २१), मयूर उर्फ गुड्ड्या फुलपगारे (वय २५) आणि वैभव गवळे (वय २०, सर्व रा. देवपूर धुळे) या चौघांना जन्मठेपेसह ॲट्रासिटीच्या गुन्ह्यात दोषी ठरविले. या चौघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. शिवाय १० हजाराचा दंड देण्यात आला. दंड न भरल्यास १ वर्षाची शिक्षा भोगावी लागणार आहे. तर या प्रकरणातील संशयित आरोपी दादा फुलपगारे हा खून व खुनाचा प्रयत्न या कलमातून निर्दोष सुटला. मात्र अन्य कलमान्वये त्याला आणखी साडेतीन वर्षाचा कारावास भोगावा लागणार आहे. १० हजाराचा दंड आणि दंड न भरल्यास ३ महिन्याची शिक्षा भोगावी लागेल.
दरम्यान, या प्रकरणातील संशयित गोपाल चौधरी, भैय्या बाविस्कर, सनी सानप या तिघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली आहे. याकामी ॲड. श्यामकांत पाटील, ॲड. सी. डी. सोनार, ॲड. नीलेश दुसाणे, ॲड. विशाल साळवे, ॲड. उमाकांत घोडराज यांनी मेहनत घेतली.