वडिलांचा खून करणाऱ्या मुलाला जन्मठेप, धुळे न्यायालयाचा निकाल
By देवेंद्र पाठक | Published: December 11, 2023 06:02 PM2023-12-11T18:02:47+5:302023-12-11T18:03:12+5:30
धुळे : भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पित्यावर चाकूने वार करीत खून करणाऱ्या मुलाला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...
धुळे : भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पित्यावर चाकूने वार करीत खून करणाऱ्या मुलाला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी दिला. सुखराम पेमा पावरा (वय ५१, रा. कढईपाणी, पो. उर्मदा, ता. शिरपूर) असे आरोपीचे नाव आहे. पेमा पावरा असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
सुखराम पावरा आणि त्याची पत्नी बायटाबाई पावरा यांच्यात १६ जून २०२२ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास राहते घरी भांडण सुरू होते. त्यावेळी सुखराम याचे वडील पेमा पावरा हे भांडण सोडविण्यासाठी आले असता सुखराम याने त्यांना शिवीगाळ करून त्यांच्या पाठीत चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्यामुळे पेमा पावरा रक्ताच्या थारोळ्यात पडले. ही घटना सुखरामची आई शिमलीबाई पेमा पावरा हिने प्रत्यक्ष पाहिली होती. घटनेनंतर आरोपी पळून गेला. त्यानंतर मयत पेमा पावरा याचा लहान मुलगा बिक्रम पावरा हा शेतातून सायंकाळी घरी आला. तेव्हा त्याच्या आईने त्याच्यासह ग्रामस्थांना घटनाक्रम सांगितला. त्यानंतर जखमी पेमा पावरा यांना शिरपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. मयताच्या लहान मुलगा विक्रम पावरा याने दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलिसात संशयित आरोपी सुखराम पावरा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.
याप्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. खटल्याचे कामकाज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांच्या न्यायालयात झाले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय मुरक्या यांनी एकूण ८ साक्षीदारांचा साक्ष नोंदविल्या. त्यावरून न्यायालयाने आरोपीने पेमा पावरा यांचा चाकूने मारून खून केला हे ग्राह्य धरले. न्यायालयाने आरोपी सुखराम पेमा पावरा याला जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास त्यास १ महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली. जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता बी. डी. भोईटे यांचे सहकार्य लाभले. तर अतिरिक्त सरकारी वकील संजय मुरक्या यांनी कामकाज पाहिले.