साडेपाच लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:59 AM2019-07-16T11:59:27+5:302019-07-16T11:59:53+5:30
होळनांथेतील घटना : दोन सराफा दुकानांंमधून ४५ ग्रॅम सोने, ९ किलो चांदीचे दागिने चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
होळनांथे : येथील मुख्य बाजारपेठेतील दोन सराफा दुकाने फोडून चोरट्यांनी सुमारे साडेपाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. मात्र सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हा प्रकार लक्षात आला. दोन्ही दुकानांमध्ये मिळून ४५ ग्रॅम सोने व ९ कि.ग्रॅ.चांदी असा एकूण ऐवज चोरीला गेला आहे. श्वानाने बसस्थानकापर्यंत माग दाखविला. फिंगरप्रिंट तज्ञांनाही पाचारण करण्यात आले.
गावातील मुख्य बाजारपेठेत किरण नरेंद्र सोनार यांचे श्रीकृष्ण ज्वेलर्स व बाळकृष्ण महादू भालेराव यांचे भालेराव ज्वेलर्स ही दुकाने आहेत. चोरट्यांनी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास दोन्ही दुकानांच्या शटर पट्टी कापून आत प्रवेश केला. किरण सोनार यांच्या दुकानातून २५ ग्रॅम सोने व ५ कि.ग्रॅ. चांदी तर बाळकृष्ण सोनार यांच्या दुकानातून २० ग्रॅम सोने व ४ कि.ग्रॅ.चांदी असे दोघे मिळून साडेपाच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. सकाळी साडेआठ वाजता दोन्ही दुकानदार दुकाने उघडण्यास आले असता हा प्रकार लक्षात आला. तुषार सोनार यांनी थाळनेर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान वाघ, कर्मचारी कृष्णा पावरा, शिराज खाटीक, नरेश मंगळे यांनी घटनास्थळी पाहणी केली. चोरट्यांनी शटरपट्ट्या कापण्यासाठी कटरचा वापर केल्याचे दिसून आले.
दागिन्यांचे ट्रे पाटचारीत फेकले
चोरट्यांच्या तपासासाठी श्वान पथकास पाचारण केले. श्वानाने बस स्थानकापर्यंत दाखविला. फिंगरप्रिंट तज्ञांनाही बोलविण्यात आले होते. चोरट्यांनी दुकानातील कपाटामधून दागिन्यांचे ट्रे गायब केले. दागिने काढून रिकामे ट्रे तसेच सीसीटीव्ही कॅमेरा चोरट्यांनी बभळाज रस्त्यावरील पाटचारीच्या पाण्यात फेकलेले आढळले. येथील बांधकाम व्यावसायिकाच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सफेद वाहनातून रात्री २.२६ वाजता येताना तर २.४० वाजता जाताना दिसत आहेत. श्वानाने दाखविलेल्या मागनुसार चोरट्यांनी पाटाजवळ थांबून दागिने काढले व ट्रे पाण्यात फेकून बभळाज रस्त्याने पसार झाल्याचा कयास आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.