मालपूर परिसरात तीन ठिकाणी वीज पडली, नारळाच्या झाडाला आग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 04:57 PM2023-04-18T16:57:42+5:302023-04-18T16:58:27+5:30
सिमेंट काँक्रीटच्या घराला तडे पडून विद्युत उपकरणेही जळाली. सुदैवाने जीवितहानी कुठे झाली नाही.
रवींद्र राजपूत
मालपूर (जि.धुळे) : वादळी वारा व विजांचा तडाखा मालपूर परिसराला बसला आहे. मालपूर येथे मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास तीन ठिकाणी वीज पडल्याची घटना घडली. यात एका नारळाच्या झाडाला आग लागली. सिमेंट काँक्रीटच्या घराला तडे पडून विद्युत उपकरणेही जळाली. सुदैवाने जीवितहानी कुठे झाली नाही.
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे मंगळवारी सकाळीच ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. सकाळी ११.४० वाजेच्या सुमारास संतोषी मातानगरातील सुनील पंडित कोळी उर्फ आण्णा मिस्तरी यांच्या घरावर वीज कोसळली. यात भिंतीला लागून असलेल्या नारळाच्या झाडाला आग लागली, तर सिमेंट काँक्रिटच्या घराला ठिकठिकाणी मोठे तडे गेलेले आहेत. वीज पडताना प्रचंड आवाज झाला. अनेक घरांतील भांडी खाली पडली. यापकारामुळे ग्रामस्थ भयभीत झाले. याच सुमारास विद्युत पुरवठादेखील खंडित झाला होता. यानंतर जमलेल्या नागरिकांनी घराच्या छतावर चढून नारळाच्या झाडाला शिडी लावली. आग लागलेल्या फांद्या छाटून झाडावर पाण्याचा वर्षाव करत आगीवर नियंत्रण मिळविले.
विजेमुळे कोळी घराच्या स्लॅबला तडे गेले, तर घरातील फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर, विद्युत उपकरणे जळून खाक झाले. तसेच मोयाणे, चोरझिरा, मांडळरोड येथील शेतशिवारातदेखील वीज पडली. यात चोरझिरा शिवारात गुरांचा चारा जळाला, तर मांडळरोड व मोयाणे शिवारात विद्युत वितरण कंपनीच्या तारा तुटल्या. काही ठिकाणी विद्युत पोलवरील विद्युत रोधक उपकरणे तुटून फुटून मोठे नुकसान झाले आहे. भरदिवसा गावात वीज पडल्याने ग्रामस्थ भयभीत झालेले असून, झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी आण्णा मिस्तरी, बापू शिंदे, ईश्वर माळी यांनी केली आहे.