धुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांची प्रारुप यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 05:45 PM2018-05-19T17:45:07+5:302018-05-19T17:45:07+5:30
भाजपची हरकत : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची पूर्वतयारी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र २५ मेनंतर निवडणूक केव्हाही जाहीर होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून तयारी सुरूच आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील मतदानकेंद्रांची प्रारूप यादी जाहीर करण्यात आली असून त्यावर २० मेपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. आजअखेर भाजपने साक्री येथील मतदान केंद्राबाबत हरकत घेतली आहे.
गेल्या निवडणुकीप्रमाणेच जिल्ह्यात १२ मतदानकेंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यात साक्री तालुक्यात दोन, शिंदखेडा दोन, शिरपूर तीन व धुळे तालुक्यात पाच अशी एकूण १२ मतदानकेंद्रांची प्रारूप यादी निवडणूक उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे. तत्पूर्वी विविध राजकीय पक्ष, शिक्षक संघटना यांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यात त्यांना प्रस्तावित केंद्रांची सर्व प्रक्रिया समजावून सांगितली. तसेच प्रारुप यादीसंदर्भात तुमच्या सूचना, हरकत, अभिप्राय असल्यास ते देण्याचे आवाहन केले.
या बैठकीला प्र.जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे (निवडणूक), कम्युनिस्ट पार्टीचे प्रवीण शिंदे, बसपाचे अनिल दामोदर, टीडीएफचे उमेदवार संदीप बेडसे यांच प्रतिनिधी केतन भदाणे, शिक्षक संघटनेचे संजय पवार, राष्टÑवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांचे प्रतिनिधी शशिकांत पाटील आदी उपस्थित होते.
भाजपतर्फे हरकत दाखल
साक्री तालुक्यातील साक्री येथे न्यू इंग्लिश स्कूल येथे असलेल्या मतदान केंद्रास भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) बबन चौधरी यांनी हरकत घेतली आहे. तसेच तेथील सी.गो. पाटील महाविद्यालयात हे मतदान केंद्र ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सुटी संपल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे सोमवारी रूजू होत आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणाºया बैठकीत या संदर्भात निर्णय घेऊन तो मुख्य निवडणूक अधिकाºयांना कळविला जाईल. भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर निर्णय अंतिम होईल.
शिक्षक मतदार संख्येत ५०० ने वाढ
२०१२ मध्ये झालेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी ७ हजार ४२६ मतदार होते. यावेळी ही संख्या सुमारे ५०० ने वाढली असून ७ हजार ९१९ एवढी झाली आहे. निरंतर प्रक्रियेंतर्गत अद्याप मतदार नोंदणी सुरू असून त्या अंतर्गत १४८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांची डाटा एन्ट्री झाली असून या मतदारांची भर पडून मतदारसंख्या ८ हजारावर पोहचणार आहे. माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक हे शिक्षक मतदारसंघाचे मतदार असतात.