चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद - नवीन मराठी उद्योजक घडविण्यासाठी प्रयत्न !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 10:16 PM2019-08-03T22:16:43+5:302019-08-03T22:17:00+5:30
संडे स्पेशल मुलाखत सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सदस्य संग्राम लिमये - अपयश यशाची पहिली पायरी समजली जाते व्यवसाय करतांना अपयश येत असेल तर खचून न जाता योग्य नियोजन केल्यास प्रगती साधता येते.
चंद्रकांत सोनार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक होण्याची प्रेरणा मिळण्यासाठी सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून अभियांत्रिकी महाविद्यालयाशी सामंजस्य करार केला आहे़ युवा उद्योजक सेलच्या माध्यमातून नवीन मराठी उद्योजकता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात़ सदस्यांच्या माध्यमातुन आतापर्यत साडे बारा करोड रुपयांची उलाढाल यशस्वीरित्या झाली आहे, असे इंजि.संग्राम लिमये यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
प्रश्न : उद्योगात अपयश येईल अशी भीती असलेल्यांना आपण काय सांगाल?
उत्तर: पहिल्यांदा कोणताही छोटा-मोठा उद्योग करतांना अपयश येईल अशी भिती मनात असते़ मात्र उद्योजकांची मानसिकता बदलणे हा सॅटर्डे क्लब मुख्य उद्देश आहे बहुतांश मराठी तरुण उद्योगाकडे रिस्क म्हणून बघतात संधी म्हणून बघत नाही नोकरी मिळाली नाही तर नाईलाजाने म्हणून उद्योगाकडे वळतात अशा मानसिकतेतून उद्योग सुरू केल्यास तो सफल व्हायची शक्यता कमी असते.
प्रश्न : उद्योगाचा वारसा नसतांना उद्योग उभारणीसाठी संस्थेची काय मदत होईल?
उत्तर: उद्योग क्षेत्रामध्ये बहुतांश उद्योजकांना पहिल्या पिढीचा वारसा असल्याने त्यांना अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता भासत नाही़ मात्र उद्योगाचा वारसा व अनुभव नसलेल्या उद्योजकांना अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन केले जाते़ त्यामुळे दरवर्षी विविध क्षेत्रातील उद्योजक आपल्या उद्योगाची उभारणी करतात़
प्रश्न : उद्योग वाढीसाठी उद्योजकांना कोणती मदत केली जाते ?
उत्तर: व्यवसाय वाढीसाठी वेगवेगळ्या परिषदा, चर्चासत्रांचे आयोजन केले जाते ज्यामधून त्यांना यशस्वी उद्योजकांचे अनुभव व मार्गदर्शन मिळते़ इंटरनॅशनल बिझनेस सेलच्या माध्यमातून इम्पोर्ट-एक्सपोर्टसह देशाबरोबर व्यापार कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले जाते. एकाच व्यवसायातील लोकांनी एकमेकांकडे प्रतिस्पर्धी म्हणून न बघता एकत्र येत सहकार्याच्या (कोलेबोरेशन)च्या माध्यमातून कसे काम वाढवता येईल याबद्दल मदत केली जाते़
स्वर्गीय माधवराव भिडे यांनी २००० मध्ये मुंबईत या संस्थेची स्थापना केली़ क्लबच्या राज्यात ५७ शाखा तर ३ हजार सभासद आहेत. दर महिन्यातून २ वेळा उद्योजकांनी एकत्र यावे व त्यांचा व्यवसाय वृद्धीसाठी एकमेकांना मदत करावी, असा हेतू आहे.
मोबाईल अॅपच्या माध्यमातुन व्यवसायाची वृध्दी
एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत हे बोधवाक्य घेऊन महाराष्ट्रीयन उद्योजकांना मदत करणारी संस्था आहे़ सॅटर्डे क्लबने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेलच्या माध्यमातून मोबाईल अप्लिकेशन डेव्हलप केले आहे़ ज्यामध्ये सॅटर्डे क्लबच्या संपूर्ण सभासदांचा डेटा उपलब्ध असतो. प्रत्येक गावातील वेगवेगळे सभासद कुठल्या व्यवसायात आहेत, कुठल्या प्रकारच्या सेवा देतात याबद्दल माहिती मोबाइल अँप्लिकेशनच्या माध्यमातून मिळते, त्याआधारे सभासदांना व्यवसाय वाढवायला निश्चित मदत मिळते़