तब्बल सोळा महिने धुळ्यात होते वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 10:59 PM2019-09-14T22:59:54+5:302019-09-14T23:01:26+5:30
भारतरत्न सर विश्वेश्वरैया : शहराची पाणीपुरवठा योजना व रचना करण्यात योगदान
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त देशभरात अभियंता दिन साजरा केला जातो त्यानिमित्त विश्वेश्वरैय्या यांच्या कार्याविषयी घेतला आढावा
विश्वेश्वरैय्या यांचा जन्म आंध्र प्रदेशातील कोलार जिल्ह्यातील मोक्षगुंडम येथे झाला होता़ त्यांचा आंध्रप्रदेशात जरी झाला तरी महाराष्टाशी आणि विशेष करुन धुळे शहराशी विशेष नाते होते. विश्वेश्वरैय्या यांच्या कारकिदीर्ची मुहूर्तमेढ धुळ्यातून झाली होती़ १८८४ ते १९०८ पर्यंत ते मुंबई सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक इंजिनीअर पदावर होते. १८८४ च्या मार्च महिन्यात नाशिक येथे असिस्टंट इंजिनियर म्हणून बांधकाम विभागात नियुक्ती झाली होती़ त्यानंतर नाशिक येथून धुळ्यात विश्वेश्वरैय्या यांची बदली झाली होती़
तेव्हा विश्वेश्वरय्या बांधकाम विभागाच्या जुन्या कार्यालयातील एका खोलीत बसत होते़ त्याकाळात त्यांनी शहराचा सखोल अभ्यास करून डेडरगाव तलाव ते धुळे शहर जलवाहिनी, दातर्ती येथील सायफन्स, पांझरा नदीवरील १८८ फड बंधाऱ्याची कामे केली होती़
विश्वेश्वरैय्या यांच्या आठवणी धुळेकरांच्या कायम स्मारणात राहण्यासाठी बांधकाम विभागाच्या कार्यालयात एक सुंदर स्मारक व संग्रहालय उभारण्यात आले आहे़
स्मृती संग्रहालयात त्यांच्या आठवणी
धुळे शहरातील बांधकाम विभागात भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या स्मृती समितीने विश्वेश्वरय्या स्मृती संग्रहालय उभारले आहे. यामध्ये विश्वेश्वरय्या यांचा जीवनप्रवास आणि काही खास फोटो पहायला मिळतात. त्यामुळे धुळेकरांना त्यांचा आठवणी कायमस्वरूपी स्मारणात राहतील़