टॅक्सीचालकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:24 PM2020-05-08T22:24:02+5:302020-05-08T22:24:25+5:30
कोरोनाचा फटका : उपासमारीसह कर्ज फेडण्याचा सतावतोय विचार
धुळे : कोरोनाच्या लॉकडाउनमुळे टॅक्सीचालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ टॅक्सी बंद असल्याने हातावर पोट असणारे चालक कर्जबाजारी होत आहेत़ त्यामुळे टॅक्सीचालकांना शासनाने मदत करावी, अशी मागणी जयहिंद टॅक्सीचालक मालक संघटनेचे अध्यक्ष रविंद्र आघाव यांनी केली आहे़
जिल्ह्यात तब्बल शंभराच्या आसपास टॅक्सी चालक आणि मालक आहेत़ धुळे शहरात या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या हजाराच्या घरात आहे़ त्यात ७५ टक्के चालक आहेत जे भाडेतत्वाची टॅक्सी चालवतात़ टॅक्सी चालवून दररोज मिळणाºया कमाईवर त्यांचे घर चालते़ परंतु कोरोनाच्या लॉकडाउनमुळे गेल्या महिनाभरापासुन टॅक्सी बंद असल्याने या सर्वांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ अनेकांनी बँक अथवा खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेवून टॅक्सी खरेदी केल्या आहेत़ तर काहींनी मुलांचे शिक्षण, घराचे बांधकाम, लग्न समारंभ यासह इतर कौटुंबिक गरजांसाठी बचत गटांचे कर्ज काढले आहे़ त्याचेही हप्ते थकले आहेत़ शिवाय हातात असलेला पैसा खर्च झाल्याने आता उधार उसनवार करुन घर चालवावे लागत आहे़ त्यामुळे टॅक्सीचालक कर्जबाजारी होत आहेत़ ज्यांच्या घराची परिस्थिती चांगली आहे किंवा कुटूंबात अन्य कुणीतरी कमावता व्यक्ती आहे, त्यांनाही झळा बसतच आहेत; परंतु केवळ टॅक्सीवर अवलंबून असणाऱ्यांची परिस्थिती सध्या खालावली आहे़
टॅक्सी चालकांकडे दुर्लक्ष
४धुळ्यातून शिरपूर, साक्री, शिंदखेडा, सोनगीर, दोंडाईचा यासह पारोळा, अमळनेर या ठिकाणी टॅक्सीचालक आपले वाहन घेऊन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवितात़ त्यांच्यावर शेकडो जणांचे पोट असल्याने त्यांच्यावर कोरोनामुळे नवे संकट उभे राहिलेले आहे़ रिक्षा चालकांना ज्याप्रमाणे मदतीसाठी प्रशासन धावले त्याप्रमाणे टॅक्सीचालकांसाठी देखील प्रशासनाने पुढे यायला हवे़ सध्या होत असलेली उपासमारी थांबविण्यासाठी प्रयत्न झाले पाहीजे, दुर्लक्ष करु नये अशी मागणी आहे़