मालपूर परिसरात पशुधन रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:40 PM2020-07-28T22:40:13+5:302020-07-28T22:41:35+5:30
दोन वर्षांपासून पशुधन विकास अधिकारी व परिचर ही दोन्ही पदे रिक्त
मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे सुमारे दोन वर्षांपासून पशुधन विकास अधिकारी व परिचर ही दोन्ही पदे रिक्त आहेत. यामुळे येथील पशुपालकांची प्रचंड गैरसोय होत आहे. योग्य उपचाराअभावी किंमती पशुधन मुत्युमुखी पडत आहे. यामुळे शेतकरी, पशुपालक हवालदिल झाले आहेत.
मालपूर हे धुळे जिल्ह्यातील सर्वात जास्त दुध उत्पादन करणारे गाव आहे. येथे विविध वंशाच्या गायी असून पशुची संख्या देखील मोठ्या आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे दूषित पाणी किंवा रानातील अपरिपक्व हिरवा चारा खाल्ल्यामुळे गुरांना विषबाधा होऊन आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यक उपलब्ध नसल्यामुळे वेळेत औषधोपचार होऊ शकत नाही. यामुळे पशुपालकांची मोठी गैरसोय आहे. येथील दवाखान्यातील वर्णोपचार पी.व्ही. चव्हाण हे आजारी गुरांवर उपचार करतात. प्रसंगी गंभीर गुरांवर भ्रमणध्वनीवरुन इतर डॉक्टरांशी सल्ला मसलत करुन औषध देत असतात. यामुळे येथील पशुवैद्यकीय दवाखाना भ्रमणध्वनीवरुन चालत असल्याचे दिसून येत आहे.
वेळेत योग्य उपचाराअभावी येथील दुधाळ जनावरे मुत्युमुखी पडत आहेत. दिवसाला २० ते २५ लिटर दूध देणारी कैलास खलाणे यांची ६० हजार रुपये किंमतीची गाय पोटात वासरु मेल्याने मुत्युमुखी पडली. तर काही जनावरे योग्य उपचाराअभावी कायमस्वरुपी आजारी पडत असल्याने त्याचा मोठा फटका येथील पशुपालकांना बसत आहे.
येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला मालपुरसह इतरही गावे जोडली आहेत. यात चुडाणे, कलवाडे, अक्कलकोस, सुराय या गावांचा समावेश आहे. यात सुराय गावालाही दुग्ध व्यवसाय बऱ्यापैकी असल्यामुळे सहाजिकच जनावरांची संख्या तेथेही मोठी आहे.
पावसाळ्याच्या दिवसात विषबाधा, लाय, खुरगट, पाय लंगडे होणे, खुरांचे आजार, शेळ्यामेंढयांना साथीचे आजार बळावत असतात. मात्र, डॉक्टरच उपलब्ध नाही तर करायचे काय, असा प्रश्न पशुपालकांपुढे निर्माण झाला आहे. यात खाजगी गुरांच्या डॉक्टरांचे मात्र फावते आहे. पशुधन मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आजारी गुरांवर उपचारासाठी गरजू पशुपालकांना अव्वाच्या सव्वा रक्कम मोजावी लागत आहे. यामुळे येथे अनुभवी पशुधन विकास अधिकाऱ्यांची नितांत गरज आहे.
एकीकडे विविध वाणांचे तसेच भरपूर दुध देणाºया कालवडीच्या पैदाससाठी पशुपालकांनी कृत्रिम रेतन केले पाहिजे, असे सांगितले जाते तर दुसरीकडे कृत्रिम रेतन करणारे उपलब्ध होत नाही.
यामुळे येथील दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. मालपूर गावात लहान मोठ्या १२ डेअरी असून दोन दूध शितकेंद्र आहेत. जिल्हाभरातून येथे दुध एकत्रित करून शितकेंद्रात प्रक्रिया करुन गुजरात राज्यात पुरवठा केला जातो.
मालपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात एक पशुधन विकास अधिकारी, वर्णोपचार, परिचर अशी मंजुर पदे असून त्यापैकी पशुधन विकास अधिकारी व शिपाई, परिचर ही पदे सुमारे दोन वर्षांपासून रिक्त आहेत. वर्णोपचार भ्रमणध्वनीवरून दवाखाना चालवत आहेत.
येथील दवाखान्यातंर्गत २ हजार ४३६ मोठी जनावरे तर ७८० लहान जनावरे व ७८९ शेळ्यामेंढयांची जुनी नोंद आहे. यामुळे मालपूर येथे त्वरित पशुधन विकास अधिकाºयांची नियुक्ती करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्या चंद्रकला पाटील, गोपाल डेअरीचे चेअरमन श्रावण अहिरे, सचिव बारीकराव मोरे, पशुपालक दामु अहिरे, ईश्वर वाघ आदींसह पशुपालकांनी केली आहे.