अल्पवयीन मुलीची तस्करी स्थानिक गुन्हे शाखेने रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:43 AM2019-08-28T11:43:35+5:302019-08-28T11:44:55+5:30
एक संशयित ताब्यात : मुलीला केले पालकांच्या स्वाधीन
धुळे : साधारण एक वर्षापासून पळवून नेलेल्या मुलीचा शोध घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकाला यश आले आहे़ याप्रकरणी एकाला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे़ दरम्यान, त्या मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीनही करण्यात आले़
धुळे जिल्ह्यात मागील वर्षभरापासून अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसत आहे़ त्याबाबत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल होते़ सदर मुलींचा अनैतिक मानवी वाहतुकीसाठी वापर होण्याची दाट शक्यता असल्याने त्यांचा त्यासाठी वापर होऊ नये यासाठी तात्काळ शोध घेऊन त्यांची अनैतिक मानवी वाहतूक होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक निर्माण करण्यात आले होते़
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली आणि त्यानुसार मंगळवारी देवपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पीडित मुलीस पळवून नेणारा मुलगा तिला घेऊन वलवाडी शिवारात येणार आहे़ अशी माहिती मिळताच वलवाडी शिवारात पोलिसांनी सापळा लावला होता़ पीडित मुलगी आणि तिला पळवून नेणारा मुलगा हे तेच असल्याची खात्री होताच पथकाने त्यांना ताब्यात घेतले आहे़ त्याची चौकशी सुरु असून त्या अल्पवयीन पीडित मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे़
पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक नंदा पाटील, अनिल पाटील, हनुमान उगले, हेड कॉन्स्टेबल सुनील विंचुरकर, महेंद्र कापुरे, पोलीस कर्मचारी गौतम सपकाळे, कविता देशमुख, केतन पाटील यांनी ही कारवाई केली़