लॉकडाउनमध्येही प्राध्यापकांचे कार्य सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 09:59 PM2020-04-10T21:59:33+5:302020-04-10T21:59:52+5:30
विधी महाविद्यालय : व्हॉटस्अप ग्रुपच्या माध्यमातून आॅनलाईन लेक्चरचा स्तुत्य उपक्रम
धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेले आहे. अशाही परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालय धुळे यांनी विद्यार्थ्यांची निरंतर संपर्क ठेवला असून विद्यार्थ्यांना सर्वच प्राध्यापक हे आपापल्या विषय निहाय शिकवत आहेत.
राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्याने, महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांमध्ये देखील ताटातूट झाली. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांसाठी व्हाट्सअपच्या माध्यमातून वर्गनिहाय ग्रुप तयार करून त्यावर आॅडिओ लेक्चर पाठवून विद्यार्थ्यांशी संपर्क सुरू झाला. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी वर्गनिहाय या ग्रुप मध्ये सदस्य म्हणून समाविष्ट करून घेतले आहेत. ह्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांचा समावेश केल्याने सर्व विद्यार्थ्यांची संपर्क साधणें हे सहज शक्य झाले आहे. सर्व प्राध्यापक आपापल्या परीने आॅडिओ लेक्चर, पीपीटी, अभ्यासाचे साहित्य या ग्रुप वर पाठवून विद्यार्थ्यांची अखंडपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. लॉक डाऊन काळात घरीच राहून विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती ही ढासळू शकते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र शासन आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी वेळोवेळी केलेले आदेश मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून संपर्कात ठेवण्याचा प्रयत्न केला गेला.
या उपक्रमासाठी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष महेंद निळे, संचालिका नालंदा निळे, मितेश निळे, संस्थेचे सचिव शशिकांत पाटील यांनी वेळोवेळी प्रेरणा दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय बहिरम यांनी सदर उपक्रमासाठी परिश्रम घेतले. त्यात महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील सहकार्य केले.
दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळा देखील सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांना घरबसल्या मोबाईल, लॅपर्टापवरुन आॅनलाईन शिकविले जात आहे़