म्हसदी येथे लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 12:20 PM2020-08-01T12:20:15+5:302020-08-01T12:20:57+5:30
कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू : गावात सर्वेक्षणाचे काम सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसदी : येथील कोरोनाग्रस्त ६५ वर्षीय महिलेचा उपचार दरम्यान धुळे येथे मृत्यू झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून म्हसदी (प्र.नेर) गाव तीन दिवस शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रविण चव्हाणके यांनी दिली.
याकाळात केवळ दवाखाना व मेडिकल सुरू राहतील. या व्यतिरीक्त अन्य व्यावसायिकांनी दुकाने उघडल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही तहसीलदारांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आयोजित बैठकीत दिला.
म्हसदी गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीच्यावतीने गेल्या चार महिन्यांपासून काळजी घेतली होती. यासाठी ग्रामपंचायतीने गावात सॅनिटायझरची फवारणी व मोफत मास्क वाटप केले. मात्र अचानक रूग्ण आढळून आल्यामुळे आणि उपचार दरम्यान रूग्णाचा मृत्यू झाल्यामुळे खळखळ उडाली आहे. त्यामुळे रूग्ण राहत असलेला भाग सील करण्यात आला आहे. तर रूग्णाच्या संपर्कातील पाच जणांना तपासणीसाठी भाडणे (ता.साक्री) येथील कोवीड सेंटरला पाठवण्यात आले आहे. तेथे त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तर गावात ग्रामपंचायतीच्या वतीने निजंर्तुकीकरणासाठी फवारणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तर रूग्णाचा परिसर कन्टेन्मेट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचे धार्मिक सण साजरे करता येणार नाहीत. पाच पेक्षा जास्त जण एकत्र दिसल्यास कार्यवाही करण्यात येईल असा इशाराही तहसीलदार प्रविण चव्हाणके यांनी बैठकीत दिला. यावेळी ग्रामविकास अधिकारी मेघश्याम बोरसे यांनी प्रास्ताविक केले. सरपंच कुंदन देवरे, ग्रामविस्तार अधिकारी जे.पी.खाडे, शिक्षण विस्तार अधिकारी सी.पी.अहिरे, वैद्यकीय अधिकारी कल्याणी पवार, पोलिस पाटील पोपटराव देवरे, आरोग्य सहाय्यक पी.व्ही.देवरे, आरोग्य सेविका कल्पना सोनवणे तसेच गावातील किराणा व्यावसायीक, खासगी वैद्यकीयआशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीच्यावतीने शिक्षक, अंगणवाडी सेविका व आशा कर्मचाऱ्यांच्यावतीने गावात चौदा टीमच्या माध्यमातून आरोग्य सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.