पथविक्रेत्यांना टाळेबंदीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 12:20 PM2020-07-25T12:20:10+5:302020-07-25T12:21:18+5:30

दोंडाईचा : पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेत आधारकार्डला मोबाईल लिंकिंगचा अडसर

Lockdown on street vendors | पथविक्रेत्यांना टाळेबंदीचा फटका

पथविक्रेत्यांना टाळेबंदीचा फटका

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : कोरोना टाळेबंदीत पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला असून त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी खेळते भांडवल देण्याची योजना कार्यरत झाली आहे. दोंडाईचा नगरपालिकेने सुद्धा या योजनेला हिरवा कंदील दाखविला आहे. नगरपालिका हद्दीत ५११ पथविक्रेते आहेत. या योजनेसाठी आधारकार्ड व आधारकार्ड संलग्न मोबाईल क्रमांक असणे अनिवार्य आहे. परंतू बहुतांश पथविक्रेत्यांच्या आधारकार्डला मोबाईल लिंकिंग नसल्याने या योजनेला अडसर निर्माण झाला आहे.
कोरोना टाळेबंदीत छोटे दुकानदार, पथविक्रेते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ते अल्प भांडवलावर सर्वसामान्य ग्राहकाला सेवा देतात.
परंतू कोरोना काळात त्यांचे भांडवलही संपले आहे. त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या वित्त विभागाने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर योजना सुरू केली आहे. या योजनेत ७ टक्के दराने फेरीवाल्यास १० हजार रुपयांचा वित्त पुरवठा केला जाणार आहे.
दोंडाईचा नगरपालिकेमार्फत या योजनेसाठी आॅनलाईन सर्व्हे झाला असून शहरात ५११ फेरीवाले आढळून आले आहेत. पथविक्रेत्यास ओळखपत्र आवश्यक असून तो नगरपालिका हद्दीतला असल्याचे शिफारसपत्र आवश्यक आहे. या योजनेसाठी नागरी सुविधा केंद्रात जाऊन आॅनलाईन ५० रुपयांचा फॉर्म भरावा लागेल.
तो फेरीवाला नगरपालिका हद्दीतील असून त्याचे नाव असल्याचे व्हेरिफिकेशन नगरपालिकेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी करतील. या योजनेसाठी समिती गठीत करण्यात आली असून समितीचे अध्यक्ष मुख्याधिकारी असतील. परंतू या योजनेसाठी फेरीवाल्याकडे आधार कार्ड व आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंकिंग (संलग्न) असणे आवश्यक आहे.
दोंडाईचा नगरपालिका हद्दीत ५११ पथविक्रेते असल्याचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल भावसार यांनी सांगितले. परंतू ५११ पथविक्रेत्यांपैकी बहुतांश पथविक्रेत्यांचा मोबाईल क्रमांक आधारकार्डशी लिंकिंग नाही. यामुळे पथविक्रेत्यांची मोठी अडचण झाली आहे. सद्यस्थितीत दोंडाईचात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने आधारकेंद्र बंद आहेत. त्यामुळे लिकिंगला अडचणी येत आहेत.
ही योजना नगरपालिका व बँक अधिकारी यांच्यामार्फत राबविली जात आहे. बँकेमार्फत १० हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार असून ७ टक्के व्याज दर आकारला जाणार आहे. वर्षभरात नियमित कर्ज फेडणाऱ्यास आर्थिक सवलत दिली जाणार आहे. परंतू अद्याप दोंडाईच्यातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत कोणत्याही पथविक्रेत्यांनी प्रकरण दाखल केले नसल्याची माहिती बँक व्यवस्थापकाने दिली आहे. निर्धारित वेळेत बँकेत प्रकरण पोहचले नाही तर या योजनेचा फायदा पथविक्रेत्यांना मिळणे मुश्किल आहे.
लहान विक्रेत्यांनी, पथविक्रेत्यांनी तात्काळ आॅनलाईन अर्ज दाखल करून पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेचा लाभ घेऊन पुन्हा व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन नगराध्यक्षा नयनकुंवर रावल, प्रभारी मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल भावसार आदींनी केले आहे.

Web Title: Lockdown on street vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.