स्थलांतरीत मजुरांना लॉकडाउन शिथीलची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 09:56 PM2020-04-10T21:56:51+5:302020-04-10T21:57:30+5:30
शासनाच्या शिबिरांचा मोठा आधार : तमाशा कलावंतांना दिले मुळ मालकाच्या ताब्यात, मुक्काम पुन्हा मोहाडीला
धुळे : येथील अग्रवाल विश्राम भवनात महानगरपालिकेने सुरू केलेल्या कॅम्पमधील स्थलांतरीत मजुरांना लॉकडाउन शिथील होण्याची प्रतिक्षा लागली आहे़ दरम्यान या कॅम्पमध्ये एकूण ३७ नागरीकांपैकी २४ नागरीक थांबले आहेत़ तमाशा कलावंत पुन्हा मोहाडीतील आपल्या वसाहतीमध्ये परत गेले आहेत़
येथील मजुरांच्या निवाऱ्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी महानगरपालिकेने शिक्षण मंडळाचे लेखाधिकारी राजेश रमेश गायकवाड यांच्यावर सोपवली होती़ सुरूवातील त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पदरमोड करुन स्थलांतरीत मजुरांसाठी चहा नाश्ता, जेवणाची व्यवस्था केली़
दरम्यान, निराधार आणि हातावर पोट असणाºया शहरातील मजुरांना दोन वेळचे जेवण पुरविण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाºयांनी अग्रवाल भवानात मोठ्या प्रमाणावर भोजन तयार करण्याचे काम सुरू केले़ त्यामुळे भवनातील स्थलांतरीत मजुरांची देखील दररोजच्या जेवणाची सोय झाली़ शिवाय काही दानशूर लोकांकडून चहा नाश्त्याची सुविधा होत असते़ आवश्यकता भासली तर आम्ही स्वत: सेवा म्हणून चहानाश्ता देतो, अशी माहिती राजेश गायकवाड यांनी दिली़
तमाशा कलावंतांची फरफट
अग्रवाल विश्राम भवनात सुरूवातीला एकूण ३७ स्थलांतरीत मजुर होते़ त्यात १७ तमाशा कलावंतांचा समावेश होता़ लॉकडाउनमुळे सर्व यात्रोत्सव रद्द झाले आणि सुपाºयाही रद्द झाल्या़ त्यामुळे तमाशा कलावंतांसह मालकांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे़ मोहाडीतील वसाहतीमध्ये थांबलेल्या या कलावंतांची परवड होत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिल्यावर प्रशासनाने या कलावंतांना निवारा गृहात आणले होते़ परंतु हे कलावंत पुन्हा आपल्या मुळे मालकाकडे मोहाडी येथे आपल्या वसाहतीमध्ये परत गेले आहेत़ त्यात अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली येथील तमाशा कलावंतांचा समावेश आहे़ त्यातील एक महिला आणि तीन पुरूष कॅम्पमध्येच थांबले आहेत़
अग्रवाल भवनातील कॅम्पमध्ये आता २४ स्थलांतरीत मजुर थांबले आहेत़ प्रशासनाकडून आणि महानगरपालिकेकडून त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे़ वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जात आहे़ अन्नपाण्यावाचुन हाल होणार नाहीत याची दक्षता घेतली जात आहे़
स्थलांतरीत मजुरांची चांगली सोय असली तरी त्यांना घरी जाण्याची ओढ लागली आहे़ लॉकडाउन कधी शिथील होईल याची ते चातकाप्रमाणे प्रतिक्षा करीत आहेत़ परंतु देशासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे़ शेजारच्या मालेगाव आणि सेंधव्यातही रुग्ण आढळून आले आहेत़ शिवाय लॉकडाउन वाढविण्याचे संकेत शासनाने दिले आहेत़ त्यामुळे या स्थलांतरीत मजुरांना पुढील आदेशापर्यंत शासनाच्या कॅम्पचा आधार घ्यावा लागणार आहे़
सर्व स्थलांतरीत नागरीकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत़ हॅण्डवॉश आणि सॅनिटायझरची व्यवस्था करुन वेळोवेळी स्वच्छता पाळली जात आहे़