लम्पी स्किन आजाराची लस उपलब्ध करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:39 AM2021-09-27T04:39:33+5:302021-09-27T04:39:33+5:30
ना. सुनील केदार यांना दिलेल्या तातडीच्या पत्रात म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी स्किन हा आजार आढळून येत ...
ना. सुनील केदार यांना दिलेल्या तातडीच्या पत्रात म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी स्किन हा आजार आढळून येत असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसात जनावरांमध्ये लाळ, खुरगट, पोटफुगी हे आजार सर्वसाधारणपणे दिसून येतात. मात्र, लम्पी स्किन हा आजार नव्याने आढळून आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. धुळे जिल्ह्यातील धुळे, शिंदखेडा, साक्री, शिरपूर तालुक्यात अनेक जनावरे लम्पी स्किन आजाराने बाधित झाली आहेत. अंगावर गाठी येणे, फोड येणे व त्यानंतर जखम होणे अशा आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. पशुसंवर्धन तज्ज्ञांच्या मते हा आजार संक्रमित असल्याने झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे त्यावर तत्काळ उपचार होणे गरजेचे आहे. आजाराचा दुग्ध उत्पादक जनावरांवर परिणाम होऊन दुधाच्या उत्पन्नात घट होत असल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत २२ हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्यात जनावरांची संख्या जास्त असल्याने लसींची संख्या अपूर्ण पडत आहे. त्यामुळे तातडीने आवश्यक तेवढ्या लसींची उपलब्धता करुन द्यावी, अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी ना. केदार यांच्याकडे केली आहे.
कर्मचारी भरती करावी-
जिल्ह्यातील व धुळे तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची भरती करावी, यासाठी मी वेळोवेळी विधानसभेच्या अधिवेशनात मागणी केली आहे. दरम्यान, यासाठी माझा पाठपुरावा सुरु राहणार असल्याचे आ. कुणाल पाटील यांनी सांगितले आहे.