"सरकार येताच देवेंद्र फडणवीसांची इच्छा पूर्ण करणार"; पंतप्रधान मोदींचे मोठं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 03:47 PM2024-11-08T15:47:15+5:302024-11-08T15:48:14+5:30
PM Narendra Modi : धुळ्यातल्या सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांची इच्छा पूर्ण करणार असल्याचे म्हटलं आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. धुळे येथे पंतप्रधान मोदी यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी पहिली जाहीर सभा घेतली. या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला. काँग्रेसकडून एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवण्याचा खतरनाक खेळला जात असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. मात्र यावेळी पंतप्रधान मोदींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या आश्वासनाची जोरदार चर्चा सुरु आहे. महायुतीचे सरकार येताच देवेंद्र फडणवीसांची इच्छा पूर्ण करणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुळ्यात सभेला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्ष महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाआघाडीच्या वाहनाला ना चाकं आहेत ना ब्रेक आहेत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसला कधीच माफ करणार नाही, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यासोबत पालघरमधील वाढवण बंदराचा उल्लेख होताच पंतप्रधान मोदी यांनी आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा करणार असल्याचे म्हटलं आहे.
"राज्यात इलेक्ट्रॉनिक वाहन प्रकल्प, पोलाद प्रकल्प, हरित प्रकल्प यासारखे प्रकल्प विविध भागात स्थापन झाले आहेत. महाराष्ट्राचा विस्तारही थांबतो. भारतातील सगळ्यात मोठं बंदर महाराष्ट्रात बनत आहे. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी मी आलो होतो, तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी एक इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, तुम्ही इतकं सगळं करत आहात आणि तिथे विमानतळही बांधा. त्या दिवशी मी शांत बसलो होतो. पण जशी आचारसंहिता संपेल आणि महायुतीच्या सरकारचा शपथविधी होईल मी महाराष्ट्र सरकारसोबत बसून देवेंद्र फडणवीसांची इच्छा पूर्ण कशी होईल याच्यासाठी काम करेल," असे आश्वासन मोदींनी दिले.
देवेंद्र फडणवीसांनी मानले आभार
"जगातील ‘टॉप टेन’मध्ये गणल्या जाणार्या पालघरच्या वाढवण बंदराचे भूमिपूजन झाले, तेव्हा मी तेथे नवीन विमानतळाची मागणी केली होती. ती मागणी पूर्ण करण्याचे अत्यंत सुस्पष्ट आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धुळ्यात दिले. पालघरमधील या नवीन विमानतळामुळे मुंबई, एमएमआर आणि एकूणच महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अतिशय मनापासून आभारी आहे," असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.