"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 01:31 PM2024-11-08T13:31:17+5:302024-11-08T13:46:24+5:30

जम्मू काश्मीरमधून भारताचे संविधान हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Attempts to remove the Constitution of India from Jammu and Kashmir says PM Narendra Modi | "पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा

"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा

PM Narendra Modi : जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान गुरुवारी आमदारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. सत्ताधारी आणि विरोधी भाजपच्या आमदारांनी एकमेकांची कॉलर पकडून एकमेकांना धक्काबुक्की केली. एका आमदारने कलम ३७० मागे घेण्याचा बॅनर सभागृहात फडकावला. याला भाजप आमदार आणि विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी विरोध केला. त्यावरुन मोठा गोंधळ उडाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात बोलताना काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून जम्मू काश्मीरमधून भारताचे संविधान हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटलं आहे.

कलम ३७० लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यास भाजप आमदारांचा विरोध असल्याने गेल्या दोन दिवसांपासून जम्मू काश्मीरच्या सभागृहात गदारोळ सुरू आहे. उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी मंगळवारी हा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ उडाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या प्रकाराबाबत भाष्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस आणि मित्रपक्षांवर निशाणा साधला.

"काँग्रेसने मित्र पक्षांसोबत मिळून सत्ता मिळवताच जम्मू-काश्मीरमध्ये कट रचण्यास सुरुवात केली आहे. जम्मू काश्मीरच्या विधानसभेत जे 
काही झालं ते तुम्ही पाहिले असेल. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाने कलम ३७० पुन्हा लागू करण्याचे विधेयक मंजूर केले आहे. देश हे स्वीकार करेल का. तुम्ही याच्याशी सहमत आहात का. काश्मीरला तोडण्याचा काँग्रेसचा हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का. कलम ३७० च्या समर्थनात विधानसभेमध्ये बॅनर फडकवण्यात आले. जेव्हा भाजपच्या आमदारांनी विरोध केला तेव्हा त्यांना उचलून बाहेर फेकण्यात आले. काँग्रेस आणि त्यांचा मित्र पक्षांचे सत्य सगळ्या देशाला आणि महाराष्ट्राला समजायला हवं. काँग्रेसने जम्मू-काश्मीर मधून भारताचे संविधान हटवण्याचे विधेयक मंजूर केले आहे," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

"स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर जम्मू-काश्मीर मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान लागू झाले आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना हे सहन होत नाहीये. मी काँग्रेस आणि इथल्या आघाडीतल्या लोकांना सांगू इच्छितो पाकिस्तानच्या अजेंड्याला देशात प्रोत्साहन देऊ नका. फुटिरतावाद्यांना साथ देऊ नका. जोपर्यंत मोदीवर जनतेचा आशीर्वाद तोवर काश्मीरातून बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हटवू शकत नाही. जगातील कुठलीही शक्ती जम्मू काश्मीरात कलम ३७० पुन्हा लागू करू शकत नाही," असा इशाराही पंतप्रधान मोदींनी दिला. 

देशातील आदिवासी जाती लढत राहण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न - पंतप्रधान मोदी

"काँग्रेस जाती जाती मध्ये भांडणे लावण्यासाठी प्रयत्न करत आहे. यातून काँग्रेस दलीत, आदिवासी, मागास वर्गाला पुढे जावू देत नाही. स्वातंत्र्य लढ्यातील बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित, वंचितांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले मात्र नेहरू यांनी ते न होण्यासाठी प्रयत्न केले. मोठ्या अडचणीत डॉ.आंबेडकरांनी आरक्षण दिले. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी देखील एस.सी.,एस.टी., ओबीसी यांचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा प्रयत्न केला. राजीव गांधी यांनी देखील ओबीसी आरक्षणचा विरोध केला होता. हा समाज मजबूत झाला तर त्यांच्या राजकारणाचे दुकान बंद होईल ही त्यांना भीती होती. या परिवाराची चौथी पिढी, त्यांचे युवराज आता तेच काम करत आहे. एस.सी., एस.टी. ओबीसी समाजात फूट पाडण्याचा ते प्रयत्न करत आहेत. त्यांची एकजूट तोडण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ते ओबीसी समाजाला जाती जातीत वाद लावत आहेत. त्यांना लहान लहान जातीत नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. स्थानिक आदिवासी जातींना एकमेकांमध्ये लढवत आहे. आदिवासींची ओळख, एकता तोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न. आदिवासींची एकता काँग्रेसला सहन होत नाही. देशभरातील आदिवासी जाती एकमेकांमध्ये लढत राहावेत यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. भारताच्या विरोधात यापेक्षा दुसरे कारस्थान होवू शकत नाही," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Attempts to remove the Constitution of India from Jammu and Kashmir says PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.