धुळे जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात सर्व पक्षांना मत विभाजनाची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 12:35 PM2024-11-07T12:35:34+5:302024-11-07T12:35:55+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीपासूनच अनेकांनी मैदानात उतरण्याची तयारी केली होती. त्यामुळे बंडखोर, अपक्षांची संख्या वाढणार, असे दिसत होते.
धुळे जिल्ह्यातील पाचपैकी चार मतदारसंघा बंडखोर उमेदवारांमुळे प्रस्थापितांसमोर अडचणी उभ्या टाकल्या आहेत त्यांच्यामुळे निवडणुकीत आता चुरस निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीपासूनच अनेकांनी मैदानात उतरण्याची तयारी केली होती. त्यामुळे बंडखोर, अपक्षांची संख्या वाढणार, असे दिसत होते. मात्र, धुळे शहर वगळता धुळे ग्रामीण, साक्री आणि शिरपूर विधानसभा मतदारसंघांत बंडखोरी कायम आहे.
काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांनीही प्रस्थापितांसमोर आव्हान उभे केले आहे. सुरुवातीला सरळ वाटणाऱ्या या लढ़ती आता तिरंगी, चौरंगी होतील, अशी स्थिती आहे. त्यामुळे महविभाजन अटळ आहे. हे मत विभाजन कोणाच्या फायद्याचे ठरते आणि कोणासाठी डोकेदुखी हे मात्र निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
साक्री मतदारसंघ : स्पर्धक तेच, झेंडे बदलले
साक्री विधानसभा मतदार संघात सर्वाधिक १८ उमेवार निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. १८ उमेदवारांपैकी ११ जण अपक्ष म्हणून नशीब आजमावत आहेत. याठिकाणी महायुती आहे. भारतीय जनता पक्षाचे साक्री विधानसभा मतदारसंघाचे प्रचारक मोहन सुर्यवंशी हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, या विधानसभा निवडणुकीत ते भाजपचे अधिकृत उमेदवार होते. तर विद्यमान आमदार मंजुळा गावीत यांना भाजप सोडून बंडखोरी करुन अपक्ष उमेदवारी केली होती. यंदाही हे दोन्ही उमेदवार आमने सामने आहेत. काँग्रेसतर्फे नवीन चेहरा माजी खासदार बापू चौरे यांचे चिरंजीय शिक्षक प्रविण चौरे यांना उमेदवारी दिली आहे.
शिरपूरला पंजा दिसणार नाही
शिरपूर विधानसभा मतदारसंघात यंदा महाविकास आघाडीतर्फे प्रथमच ही जागा भाकपला सोडली आहे. हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. इतिहासात प्रथमच या मतदारसंघात काँग्रेसचे चिन्ह दिसणार नाही. भाजपने पुन्हा एकदा विद्यमान आमदार काशिराम पावरा यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन होणार आहे
धुळे शहरात चौरंगी लढत
धुळे शहर एकमेव मतदारसंघ आहे. याठिकाणी कुठल्याही पक्षात बंडखोरी झालेली नाही. परंतू याठिकाणी महायुतीतर्फे भाजपने नवीन हिंदुत्वादी तरुण चेहरा अनूप अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे उद्धवसेनेने माजी आमदार अनिल गोटे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे समाजवादी पार्टीने नवीन चेहरा इर्शाद जहागिरदार आणि एमआयएमने विद्यमान आमदार फारुख शाह यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे याठिकाणी होणारी मतांची विभागणी ही कोणाच्या पथ्यावर पडेल आणि कोणाचे नुकसान करेल, हे निकालानंतर समजेल.
जरांगे फॅक्टरचीही धास्ती
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी या निवडणुकीत उमेदवार उभे करणार नसून, गनिमी कावा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे फॅक्टरचाही लढतीवर परिणाम होणार आहे. त्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार असून जरांगे फॅक्टरचीही धास्ती कायम आहे.