धुळे शहर, शिंदखेड्यात लाडकी बहीण निवडणुकीत दिसेना; २ मतदारसंघात महिला उमेदवारच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 11:46 AM2024-11-11T11:46:59+5:302024-11-11T11:57:09+5:30

Maharashtra Assembly Election 2024 And Dhule : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा गवगवा मोठ्या प्रमाणात सुरू असताना प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात मात्र या लाडक्या बहिणींचे स्थान कमीच दिसून येते आहे.

Maharashtra Assembly Election 2024 no women candidates Dhule city Sindkheda Assembly Constituency | धुळे शहर, शिंदखेड्यात लाडकी बहीण निवडणुकीत दिसेना; २ मतदारसंघात महिला उमेदवारच नाही!

धुळे शहर, शिंदखेड्यात लाडकी बहीण निवडणुकीत दिसेना; २ मतदारसंघात महिला उमेदवारच नाही!

धुळे : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा गवगवा मोठ्या प्रमाणात सुरू असताना प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात मात्र या लाडक्या बहिणींचे स्थान कमीच दिसून येते आहे. विशेष म्हणजे धुळे शहरासारख्या जिल्हा मुख्यालयाच्या मतदारसंघातून आणि शिंदखेडा मतदारसंघातून एकही महिला उमेदवार नाही. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांतील एकूण ५६ उमेदवारांमध्ये सातच महिला उमेदवार आहेत. 

यातही प्रमुख राजकीय पक्षांमध्ये केवळ शिवसेना शिंदे गटाकडून साक्री विधानसभेत विद्यमान आमदार मंजुळा गावित या महिला उमेदवार असून अन्य पक्षांनी मात्र महिलांना उमेदवारी दिलेली नाही. स्त्री-पुरुष समानतेच्या डांगोऱ्यात जिल्ह्यात राजकारणात महिलांना नेतृत्वाची संधी फारच कमी असल्याने पुरुषांचीच मक्तेदारी कायम असल्याचे दिसून येते. 

साक्री विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून आमदार मंजुळा गावित, मीरा शिंदे (अपक्ष), वैशाली राऊत (अपक्ष), धुळे ग्रामीण मतदारसंघात मनीषा भिल (भारत आदिवासी पार्टी), सुनीता पाटील (अपक्ष), तर शिरपूर मतदारसंघात गीतांजली कोळी (अपक्ष) व अॅड. वर्षा वसावे (अपक्ष) या निवडणूक लढवत आहेत. धुळे शहर आणि शिंदखेडा विधानसभा क्षेत्रात एकही महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाहीत.

८ लाखांहून अधिक महिला मतदार 

• धुळे जिल्ह्याच्या पाचही विधानसभा क्षेत्रात ८ लाख ८६ हजार ५७३ महिला मतदार आहेत. निवडणुकीत या महिला मतदारांचा कॉल निर्णायक ठरणार आहे. महिला सशक्तीकरण करण्याचा, महिला सुरक्षेचा, लाडकी बहीण योजना आणखीन बळकट करण्याचा मुद्दा प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात आवर्जून आहे. प्रत्यक्षात सक्रिय राजकारणात महिलांना स्थान देण्यासाठी राजकीय फारसे उत्सुक नसल्याचे जिल्ह्यात विधानसभेसाठी दाखल झालेल्या उमेदवारीतून दिसून येते. 

स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण 

• स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण देत मतदारसंघ राखीव राहतात. यामुळे गावाचा, चा, जिल्ह्याचा, शहराचा कारभार महिला यशस्वीपणे चालवताना दिसतात. यातून महिला नेतृत्व पुढे येत असले तरी त्यांना विधानसभेच्या राजकारणात एंट्री दिली जात नसल्याचे विधानसभेसाठी दाखल झालेल्या उमेदवारीतून दिसून येते. 

दोन विधानसभा क्षेत्रांत एकही महिला उमेदवार नाही

• जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत साक्री विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक तीन, धुळे ग्रामीण मतदासंघात दोन, तर शिरपूर विधानसभा क्षेत्रात दोन महिला उमेदवार आहेत. तर धुळे शहर आणि शिंदखेडा मतदारसंघात एकही महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाहीत.
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 no women candidates Dhule city Sindkheda Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.